हिमायत बागेतील आमराईत लगडलेत अमेरिकन टॉमी अँटकिन्स ऊर्फ लिली आंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:04 AM2021-05-12T04:04:12+5:302021-05-12T04:04:12+5:30
औरंगाबाद : निजामकालीन हिमायत बागेतील आमराईत अमेरिकेतील प्रसिद्ध टॉमी अँटकिन्स आंबा आपल्या लालबुंद रंगामुळे सर्वांचे लक्ष वेधून ...
औरंगाबाद : निजामकालीन हिमायत बागेतील आमराईत अमेरिकेतील प्रसिद्ध टॉमी अँटकिन्स आंबा आपल्या लालबुंद रंगामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
विदेशी सफरचंद जसे चकचकीत असतात तसाच चकचकीतपणा या अमेरिकन आंब्याला आहे. एकीकडे सर्व हिरव्या पिवळ्या रंगातील अवीट गोडीचे आंबे आणि त्यात हा लालबुंद आंबा म्हणजे काही औरच दिसतो आहे.
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील हा टॉमी अँटकिन्स आंबा युरोपात प्रसिद्ध आहे. त्यातही विशेषतः लंडनमध्ये या आंब्याला जास्त मागणी असते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, इंडो-इस्राईल कृती आराखड्यांतर्गत हिमायतबागेत २०१४ मध्ये सात हेक्टरवर विदेशी आंब्यांची लागवड करण्यात आली होती. विविध जातीचे १८०० रोप तयार केले होते. इस्रायलमध्ये प्रतिहेक्टर आंब्याची उत्पादकता २५ टन आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात चार, पाच टन एवढीच आहे. यामधील तफावत दूर करून उत्पादकता वाढवण्यासाठी केशर आंबा केंद्रात संशोधन करण्यात आले. इस्रायलच्या विकसित तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करण्यात आला. त्यात माया, लिली, टॉमी अँटकिन्स, केन्ट, आम्रपाली, पामर या आंब्याच्या जातींची केशर आंब्याच्या जातीसोबत तुलना करण्यात आली होती. हा टॉमी अँटकिन्स आंबा यंदा झाडाला लगडला आहे. दिसायला अमेरिकेतील हुबेहूब आंबा असला तरी मात्र जमीन, हवामान याचा फरक आंब्यावर होतोच. यामुळे चवीत व सुगंधामध्ये फरक येतोच. पण या आंब्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
चौकट
लिली नावाने विक्री
अमेरिकेतील या लालबुंद आंब्याची येथे ‘लिली’ नावाने विक्री केली जात आहे. लाल गडद रंग असल्याने जरा हटके दिसतो.
सुनील सलामपुरे
कंत्राटदार
कॅप्शन
हाच तो हिमायत बागेतील आमराईत आलेला अमेरिकेतील
टॉमी अँटकिन्स ऊर्फ लिली आंबा.