छत्रपती संभाजीनगरात अमित शाह पहिल्यांदाच मुक्कामी; भाजपचा उमेदवार जाहीर करणार काय?
By विकास राऊत | Published: March 5, 2024 11:26 AM2024-03-05T11:26:26+5:302024-03-05T11:41:55+5:30
अमित शाह यांची सभा म्हणजे छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा भाजप लढणार ?
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ५ मार्च रोजी सायंकाळी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होत आहे. सांस्कृतिक मंडळावर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेत गृहमंत्री शाह हे भाजपचा उमेदवार जाहीर करणार काय, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
राज्यात लोकसभेसाठी १२ क्लस्टर असून लोकसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकू, असे शाह यांनी फेब्रुवारी महिन्यात ‘लोकमत’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर त्यांची मराठवाड्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. तीन लोकसभा मतदारसंघांची ही सभा असून गृहमंत्री हे पहिल्यांदाच शहरात मुक्कामी थांबणार आहेत. ते सभेत काय बोलणार, याची उत्सुकता आहे. खडकेश्वर येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी शाह व अन्य व्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे.
देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांस्कृतिक मंडळावरच झाल्यामुळे तेथेच शाह यांची सभा व्हावी, असा आग्रह भाजपकडून होता. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी ही सभा असणार आहे. सभेला सुमारे ५० हजारांहून अधिक लोक येतील, असा दावा भाजप करीत आहे. मराठवाड्यातील पहिल्या सभेचा मान छत्रपती संभाजीनगरला मिळाला असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाह यांच्या सभेनिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. दरम्यान, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले, सभेत जास्तीत जास्त दोन ते तीन नेत्यांची भाषणे होतील. सुमारे ४० मिनिटांचे भाषण शाह यांचे असेल. ८:३० वा. ते विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
शाह यांची सभा म्हणजे जागा भाजप लढणार....
लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भारतीय जनता पक्ष, शिंदे गटासह महायुती लढणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील घटक पक्षांनाही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटालादेखील वाटाघाटीत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी ही जागा भाजप लढणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.