छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपा लढणार? अमित शाहांच्या सभेत होणार शिक्कामोर्तब
By विकास राऊत | Published: February 11, 2024 12:03 PM2024-02-11T12:03:49+5:302024-02-11T12:05:58+5:30
छ्त्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मागील लोकसभेत थोड्या मतांच्या अंतराने शिवसेनेच्या उमेदवाराचा झाला होता पराभव
छत्रपती संभाजीनगर: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पंधरा फेब्रुवारी रोजी शहरात सभा होत आहे. अमित शहा शहरात येत असल्यामुळे आणि त्यांची सभा होणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष लढणार हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्यातच ही जागा भाजप लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत ४२ जागा जिंकणार हे शहा यांनी गेल्या आठवड्यात लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत सांगितले होते. त्यातच त्यानंतर त्यांची सभा होत आहे. त्यामुळे या जागेचे पूर्ण रिपोर्ट भाजपच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरची जागा कोण लढणार यावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात राजकीय अपेक्षांचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना देखील वाटाघाटीत उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षी अमित शहा यांची कलाग्राम समोरील मैदानात सभा नियोजित करण्यात आली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. शहा यांचा दौरा देखील आला होता, परंतु हैदराबाद येथील कार्यक्रमामुळे सभा ऐनवेळी रद्द झाली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहा शहरात येत असून यानिमित्त भाजप आणि संघटना पूर्ण ताकतीने कामाला लागली आहे.