अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, शेतकरी आंदोलनाने रोखला मार्ग?
By विकास राऊत | Published: February 13, 2024 04:10 PM2024-02-13T16:10:08+5:302024-02-13T16:18:42+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा सभा रद्द
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची गुरुवारी होणारी सभा रद्द झाली आहे. सभा रद्द होण्या मागील कारण अस्पष्ट आहे. परंतु अनेक तर्क यामागे लावले जात आहेत. यात मुख्य कारण शेतकरी आंदोलनाचे असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केल्याने शाह यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपा पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेच्या तयारीची आज दुपारी पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच शाह यांचा गुरुवारचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज आला. यापूर्वी देखील सप्टेंबर 2023 मध्ये शाह यांची शहरातील सभा रद्द झाली होती.
अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभा दुसऱ्यांदा शहा रद्द झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची सभा नियोजित केली होती. त्यावेळेसही पूर्ण व्यासपीठ उभा केल्यानंतर ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. तसाच प्रकार यावेळेस सुद्धा घडला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेच्या नियोजनाची पूर्ण मेहनत वाया गेली आहे. सभेसाठी सर्व परवानगीची पूर्तता केली. दुपारी अडीचच्या दरम्यान सभा रद्द झाल्याचा निरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आला. त्यामुळे यावेळेस देखील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. दरम्यान, सभा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.
शेतकरी आंदोलनाने रोखला मार्ग ?
शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन छेडले असून दिल्लीकडे कूच केली आहे. माहितीनुसार, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. एकूणच शेतकरी आंदोलनामुळे परिस्थिती बदलत असल्याने गृहमंत्री शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द झाला असल्याची चर्चा आहे.
लोकसभेसाठी प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामने
देशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार, असे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपचा जिवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल, असे दिसते. गेली २५ वर्षे युतीत सोबत राहून अनेक देदीप्यमान विजय मिळविणारे भाजप व शिवसेना आता कट्टर विरोधक म्हणून आमनेसामने येणार असून, जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, तेही स्पष्ट होईल.