सन्मान योजनेची टोलवाटोलवी; रक्कम खात्यात जमा होत नसल्याने बळीराजा हताश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:24 PM2019-05-02T18:24:44+5:302019-05-02T18:26:15+5:30
टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे.
सोयगाव (औरंगाबाद ) : सरकारच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेबाबत नुसती टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. सर्व कागदपत्रे जमा करूनही दोन हजार रुपये खात्यात जमा होत नसल्याने या कारभाराविरुद्ध तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शासनाने जाहीर केलेली रक्कम खात्यात जमा करावी, नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोयगाव तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेसाठी कृषी, महसूल आणि पंचायत समिती या त्रिसदस्यीय समितीच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली.मध्यंतरी निवडणुकांचा अडसर योजनेला आल्याने योजनेचे काम बंद झाले. मात्र, निवडणुकानंतरही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेत रक्कम जमा न झाल्याने चौकशी करणाऱ्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून योजना कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे उत्तर मिळाले असल्याने कृषी विभागाने मात्र हात वर करून योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितल्याने निवडणुकानंतरही केवळ टोलवाटोलवीचा खेळ सुरू झाल्याने बळीराजाने संताप व्यक्त केला आहे.
महसूल विभागाकडून पोर्टलवर अपलोड करण्यात पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी आल्या होत्या. या त्रुटी संबंधित विभागाने तलाठ्याकडून दूर करूनही योजनेचा निधी खात्यावर वर्ग होत नसल्याने अचानक या योजनेचे सूत्र शासन पातळीवरून तालुका कृषी विभागाला वर्ग करण्याच्या सूचना आल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांचा डाटा कृषी विभागाला वर्ग केला; परंतु कृषी विभागाकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने योजनेला एक प्रकारे हरताळ फसल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्यातील शेतकरीच निधीच्या प्रतीक्षेत
शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी असल्याने या त्रुटी दूर करून सदोष डाटा कृषी विभागाकडे तीन दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचा दुजोरा महसूल विभागाने दिला आहे.च्दरम्यान पहिल्या टप्प्यातील कारवाईतून सुटलेल्या वंचित अल्पभूधारक शेतकऱ्यांचा डाटा संकलित करण्याचे काम संयुक्त पथकांकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही.