चुन्नीलाल पेट्रोलपंपावर मापात पाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:28 AM2017-06-24T00:28:16+5:302017-06-24T00:35:27+5:30
औरंगाबाद :चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासणीत आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील जुन्या पेट्रोलपंपांपैकी एक असलेल्या अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर मापात पाप होत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वजन- मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त तपासणीत आढळून आला. या पंपावर पाच लिटरमागे ५५ मिली ते ७५ मिलीलिटर पेट्रोल कमी मिळत असल्याचे समोर आले. या पंपावरील महत्त्वाची उपकरणे पोलिसांनी जप्त केली आहेत.
ठाणे आणि उत्तर प्रदेशातील काही पेट्रोलपंपांच्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून ग्राहकांना कमी पेट्रोल दिल्या जात असल्याचे उघडकीस आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जून रोजी रविवारी शहरातील चार पेट्रोलपंपांची तपासणी केली होती. मात्र या तपासणीत एकाही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी आढळली नव्हती. मात्र शहरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल चोरी होत असल्याची पक्की माहिती सूत्रांकडून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना मिळाली होती.
पंपचालकांची पेट्रोल चोरी तपासण्याचे तंत्रशुद्ध ज्ञान आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ठाणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनाच औरंगाबादेत बोलावून कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, संतोष सुर्वे यांचे पथक बुधवारी रात्री शहरात दाखल झाले.
वजन- मापे निरीक्षक, इंडियन आॅईल कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी ठाणे पोलिसांनी अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपावर धाड मारली.
या धाडीत तेथील पेट्रोल आणि डिझेल वितरण करणाऱ्या यंत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी वजन- मापे विभागाने आणलेल्या पाच लिटरच्या मापात पेट्रोल घेण्यात आले असता पंपावरील आकडेवारीनुसार मापात पाच लिटर पेट्रोल टाकल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात मात्र हे माप रिकामे होते. यानंतर वजन- मापे अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष त्या रिकाम्या मापात आणखी पेट्रोल टाकले. वरून टाकलेले पेट्रोल हे काही यंत्रावर ५५ मिली, ६० मिली आणि ७५ मिलीलिटर एवढे होते. यावरून या पंपावर प्रती पाच लिटरमागे ग्राहकांना ५५ मिली ते ७५ मिलीलिटर कमी पेट्रोल दिले जात होते.
शहर गुन्हे शाखेला अपयश पण...
शहर गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी शहरातील चार पेट्रोलपंपांची तपासणी केली तेव्हा या सर्व पंपांवर सर्व काही अलबेल असल्याचे जाहीर केले.
आज शुक्रवारी ठाणे पोलिसांच्या पथकाने सुरू केलेल्या तपासणीत पहिल्याच पंपावर इंधन चोरी होत असल्याचे समोर आले.