८० वर्षांच्या कर्कग्रस्ताला बोलाविले आरटीओत, ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 03:03 PM2022-09-21T15:03:57+5:302022-09-21T15:04:32+5:30
ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाहनाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी ८० वर्षांच्या कॅन्सरग्रस्ताला आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या रुग्णाला नाकातून टाकलेल्या नळीतून (राइल्स ट्यूब) अन्न, पाणी दिले जात आहे. अशा अवस्थेतील या ज्येष्ठाला पाहून अनेकांनी चिंता व्यक्त करीत कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या कॅन्सरग्रस्ताला अन्न आणि पाणी हे नळीच्या माध्यमातूनच दिले जात आहे. असे असताना वाहनाच्या हस्तांतरासाठी असलेल्या ‘बीफोर मी’ या प्रक्रियेसाठी त्यांना आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आले. कार्यालयातही खिडकीसमोर या ज्येष्ठाला तासभर ताटकळत ठेवण्यात आल्याचे अरुण माडूकर यांनी सांगितले. यासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली.
आरटीओ अधिकारी म्हणाले,
याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार म्हणाले, कार्यालयाने संबंधिताला बोलावलेले नव्हते. कॅन्सरग्रस्ताला आरटीओत घेऊन येणाराच या प्रकारासाठी जबाबदार आहे. त्याविषयी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. वाहन विक्रीत गैरप्रकार होण्याची शक्यता असते. बनावट सह्या करून वाहने विकण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘बीफोर मी’ ही प्रक्रिया राबविली जाते. कोणाची अडचण असेल तर त्यासंदर्भात योग्य ती मदत केली जाते.