पैठणच्या खुल्या कारागृहातून फरार कैदी सांगलीतील मुळगावी सापडला, ८ महिन्यांनी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 07:11 PM2023-10-23T19:11:32+5:302023-10-23T19:23:15+5:30
सांगली जिल्ह्यातील पाडळेवाडी या मूळ गावातून पोलिसांनी केले जेरबंद
पैठण: जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पैठण येथील खुल्या कारागृहातून मार्च महिन्यात फरार झालेल्या कैद्यास रविवारी मध्यरात्री पाडळेवाडी ( ता शिराळा जि सांगली ) येथून पैठण पोलिसांनी अटक केली आहे.रामचंद्र रघुनाथ पाटील (४४) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.
रामचंद्र पाटील यास सन २०१३ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती शिक्षा भोगत असताना वर्तणूक चांगली असल्याने २०१८ मध्ये कैदी रामचंद्र पाटील यास कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहातून पैठण येथील खुल्या कारागृहात वर्ग केले होते. परंतु खुल्या कारागृहात मोकळ्या वातावरणात शिक्षा भोगत असताना कैदी रामचंद्र पाटील दि १ मार्च २०२३ रोजी पैठण कारागृह प्रशासनाची नजर चुकवून फरार झाला होता.गेल्या आठ महिन्यांपासून तो पोलीसांना हुलकावणी देत होता.या प्रकरणी कारागृहाचे शिपाई सचिन पवार यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तेव्हापासून पैठण पोलीस त्याच्या मागावर होते.
दरम्यान, रविवारी कैदी रामचंद्र पाटील त्याच्या मुळ गावी घरी येणार असल्याची पक्की खबर पैठण पोलीसांना मिळाली होती.त्यावरून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी जमादार लक्ष्मण पुरी यांना पथकासह सदर कैद्यास अटक करण्यासाठी पाडळेवाडी येथे पाठवले. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी कैद्याच्या घरी जावून त्यास ताब्यात घेतले.