एका अपघाताने आठ महिन्यांच्या चिमुकल्याला केले अनाथ; पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू
By राम शिनगारे | Published: January 9, 2023 06:46 PM2023-01-09T18:46:23+5:302023-01-09T18:47:08+5:30
मुलास आजी-आजोबांच्या ताब्यात देण्यात आले आहे
औरंगाबाद : चुलत्यावर शास्त्रक्रिया झाल्यामुळे भेटण्यास आलेल्या पुतण्याच्या दुचाकीला समोरून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाचा चारचाकी गाडीने जोरात धडक दिली. या अपघातात पुतण्या जागीच ठार झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना पत्नीचीही प्राणज्योत रविवारी रात्री मालवली. त्यामुळे आठ महिल्यांचा चिमुकला मुलगा अनाथ झाला आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्यास आजी-आजोबांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू त्र्यंबक वाघ (ह.मु.मक्रनपूर, ता. कन्नड, मूळ रा. खुल्लोड, ता. सिल्लोड), पत्नी लता विष्णू वाघ (३२) हे आठ महिन्याच्या चिमुकल्यासह चुलते दत्तात्रय वाघ यांना भेटण्यासाठी रविवारी सकाळी दुचाकीवर (एमएच २० ईएच ०८१६) आले होते. चुलत्यास भेटल्यानंतर परत जाताना दौलताबादकडून भरधाव वेगात येणाऱ्या कार (एमएच २० बीवाय २७९७) चालकाने दुसऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाघ यांच्या दुचाकीला समोरच धडक दिली. हा अपघात पडेगाव-मिटमिटा परिसरातील फौजी ढाब्याजवळ झाला. यात विष्णू हे जागीच ठार झाले. तर लता या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना घाटीतील अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच रात्री ९ वाजेच्या सुमारास लता यांची प्राणज्योत मालवली. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
कारचालकावर गुन्हा दाखल होणार
या प्रकरणात छावणी पोलिस अपघाताची नोंद केली आहे. अंत्यसंस्कारानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली. अधिक तपास निरीक्षक कैलाश देशमाने यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक संजय रोकडे करीत आहेत.