किरीट सोमय्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा; खा. भावना गवळी प्रकरणाशी कनेक्शनची चर्चा
By विकास राऊत | Published: August 18, 2023 01:36 PM2023-08-18T13:36:28+5:302023-08-18T13:39:51+5:30
किरीट सोमय्या यांचा हा दौरा खा. भावना गवळी यांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाशी कनेक्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात तक्रार करणारे सीए (चार्टर्ड अकाउंटंट) उपेंद्र मुळे यांच्या सासूबाईंचे निधन झाल्यामुळे भाजपा नेते खा. किरीट सोमय्या बुधवारी त्यांच्या सांत्वनपर भेटीस आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमय्या यांनी त्यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. शहरातील भाजपाशी निगडीत एक उद्योजकही त्यांच्या सोबत होते. प्रत्यक्षात सोमय्या यांचा हा दौरा खा. गवळी यांच्या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाशी कनेक्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आलेले सोमय्या अचानक शहरात आल्यामुळे पोलिसांनी एन-६ परिसरात प्रचंड बंदोबस्त लावला होता. सीए राहत असलेल्या अपार्टमेंटला ३००हून अधिक पोलिसांनी अक्षरश: वेढा दिला होता. सुभेदारी विश्रामगृहात सोमय्या मुक्कामी होते. तेथेही पोलिस बंदोबस्त होता. खा. गवळी यांनी आर्थिक व्यवहाराचे बनावट कागदपत्र तयार केल्याची तक्रार सीए मुळे यांनी केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली. त्यावरून खा. गवळी यांच्या भोवती ईडीने फास आवळला. राज्यात ठाकरे सरकार असताना केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ईडीने राज्यात जोरदार कारवाया केल्या. यात खा. गवळी यांच्या प्रकरणाचाही समावेश होता.
ठाकरे सरकारच्या काळात तक्रारकर्ते सीए मुळे यांना वाशिम तुरुंगात जावे लागले. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट व भाजपाचे सरकार आल्यानंतर खा. गवळी यादेखील शिंदे गटात सामील झाल्या. त्यामुळे गवळी यांची ईडीपासून सुटका होणार हे निश्चित असल्याच्या चर्चेने जोर धरला. परंतु, अद्याप तसे काही झालेले नाही. दरम्यान, तक्रारकर्ते मुळे यांची तुरुंगातून सुटका झाली. काल अचानक सोमय्या त्यांच्या भेटीस आले. यासंदर्भात सीए मुळे यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
...अन् चर्चेने घेतला वेग
खा. गवळी यांना ईडीने नोटीस बजावली होती. गवळी यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून मुदतवाढ मागितली. सत्ताधारी प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मुळे यांना तक्रार मागे घेण्यास सोमय्या यांना दूत म्हणून पाठविल्याचे बोलले जात आहे. ठाकरे सरकार असताना वाशिम तुरुंगात राहावे लागल्यामुळे मुळे आता तक्रार मागे घेण्यास तयार नाहीत, असे समजते.