पावसाळ्यात अडचणीच्या वेळी मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६० जणांची फौज तयार!
By विकास राऊत | Published: June 20, 2024 05:44 PM2024-06-20T17:44:17+5:302024-06-20T17:44:40+5:30
२४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यात १६० जणांची फौज आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तयार केली आहे. २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असून, मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह तहसील, तालुक्यात नगरपालिका, शहरात महापालिकेशी संपर्क साधता येणार आहे.
जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर निळ्या रेषेखाली येणाऱ्या गावांमध्ये पैठण तालुक्यात १८, वैजापूर तालुक्यात १७ आणि गंगापूर तालुक्यात ८ अशी एकूण ४३ गावे आहेत. पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव - जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव तसेच वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाभूळगाव, बाजारठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो. तेथील यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
जिल्ह्यात आपत्कालीन कक्ष सुरू...
१ जूनपासून जिल्हा आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
१६० जणांची टीम...
१६० जणांची टीम जिल्ह्यासाठी तयार करण्यात आली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रशासनाने तयार ठेवले आहे.
२४ तास अलर्ट...
जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळ्याच्या अनुषंगाने सुरू केलेला आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहणार आहे.
पावसाळ्यात या गावांना धोका...
छत्रपती संभाजीनगर १६,पैठण १५,फुलंब्री ७,वैजापूर ३१,गंगापूर २६,खुलताबाद ६,सिल्लोड १०,कन्नड ४८,सोयगाव ६,एकूण : १६५
मदतीसाठी संपर्क कसा साधाल?
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष आहे. तसेच पाटबंधारे विभागात पूरनियंत्रण कक्ष आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी २४ तास संपर्क करता येईल.
प्रशासन सज्ज
प्रशासनाने सर्व विभागांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन विभाग २४ तास कार्यान्वित केला आहे. पावसाळ्यात प्रशासन अलर्ट मोडवर असणार आहे.
- मारुती म्हस्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
बचाव कार्यासाठी असलेली साधने अशी...
बोटी : ५ बोटी,लाइफ जॅकेट्स १९५,लाइफ बॉय १६०,बचाव साहित्य किट २१५,फोल्डिंगचे स्ट्रेचर ८१५,बॉडी कव्हर बॅग्ज ८१५,सेफ हेल्मेट्स १३२,प्रकाश योजना संच १७,गम बूट जोड २७६,तात्पुरते तंबू २०,दुर्बिणी व साहित्य : ५ वीज अटकाव यंत्रणा : ७९ ठिकाणी