‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:56 PM2023-12-23T12:56:55+5:302023-12-23T12:57:26+5:30
‘स्टुडंट व्हिसा’वर भारतात प्रवेश, महाविद्यालयात मात्र एक दिवसही उपस्थिती नाही
छत्रपती संभाजीनगर : दोन अल्पवयीन मुलांना घरात बोलावून विदेशी तरुणाने त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलेल्या ओळी म्हटल्या नाहीत म्हणून त्याने मुलांना वायरने मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक कुटुंबांनी केला. गुरुवारी रात्री हडकोत हा प्रकार निदर्शनास येताच पोलिस विभाग, एटीएससह, तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. गुरुवारी मध्यरात्रीतून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ओसामा अली युसूफ अहमद (२२, रा. सुदान, दक्षिण आफ्रिका) याला अटक करण्यात आली.
दहावीत शिकणारा १५ वर्षीय कुशल व त्याचा मित्र महेश (दोघांची नावे बदललेली आहेत) हे दोघे गुरुवारी रात्री ९ वाजता परिसरात फिरत होते. काही अंतरावर एका घराच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणाने त्यांना घरात बोलावले. त्याला काही मदत असेल, असे वाटल्याने दोघेही त्याच्याकडे गेले. ओसामाने मात्र दरवाजा लावून दोघांना खाली बसवले. एका पुस्तकाचे मोठ्याने वाचन केले. नंतर पुटपुटत कागदावर मजकूर लिहिला. तो कागद जाळून हाताने तो धूर दोघांना देऊ लागला. रोहन, महेश दोघांनी त्याला जाब विचारला. त्यावर त्याने ‘मी म्हणेल तसे म्हणा’, असे धमकावले. मुलांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने ओसामाने चार्जर त्यांच्यावर उगारले. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी तेथून धूम ठोकत घर गाठून हा प्रकार सांगितला.
तपास यंत्रणांची धावाधाव
घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ ११२ क्रमांकावर मदत मागितली. उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त धनंजय पाटील, संपत शिंदे, निरीक्षक संदीप गुरमे, निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, काशीनाथ महांडुळे यांनी धाव घेतली. सिटी चौक, गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पहाटे ओसामाला ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी एटीएस, अन्य गुप्तचर यंत्रणांनी याची दखल घेतली. ओसामाच्या काही मित्रांनाही ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. सायंकाळी ५ वाजता सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ॲड. रवींद्र अवसरमोल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली,
महाविद्यालयात गेल्याची नोंदच नाही
ओसामा ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी शिक्षणासाठी (स्टुडंट व्हिसा) भारतात आला. मौलाना आझाद महाविद्यालयात बी. कॉम.साठी प्रवेश घेतला. पोलिसांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा दुसऱ्या वर्षात शिकणारा ओसामा एकाही वेळा महाविद्यालयात गेल्याची नोंदच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांना त्याच्या घरात २ बंद मोबाइल व धार्मिक साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स, इंटरनेटचा वापर, बँकेची माहिती मागवून तपास सुरू केला.