किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल
By बापू सोळुंके | Published: April 13, 2024 12:02 PM2024-04-13T12:02:32+5:302024-04-13T12:02:48+5:30
छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत.
छत्रपती संभाजीनगर: मागील महिन्यात आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या समर्थकांची विविध पदावर नेमणुका करून घेतल्यानंतर नाराज झालेल्या जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांना मातोश्रीने काल विविध पदे बहाल केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत. मागील महिन्यात लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मातोश्रीकडे हट्ट धरला होता. उमेदवारीवरून त्यांनी जाहीर नाराजी ही व्यक्त केली होती. पक्षाने त्यांची समजूत काढत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केली होती. या निवडणुकीत पक्षांतर्गत कोणतीही गटबाजी राहू नये आणि पक्षाच्या उमेदवाराला यश मिळावे यासाठी उद्धव सेनेने दानवे यांच्या समर्थकांना विविध पदावर नेमणुका दिल्या होत्या. यातील प्रमुख नियुक्त्या या शहरातील होत्या. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या कार्यक्षेत्रात पदाधिकाऱ्यांना पदे देताना त्यांना विचारण्यात आले नव्हते, यामुळे ते नाराज झाले होते. यातून तनवाणी यांनी पक्षाच्या बैठकाकडे पाठही फिरवली अशी चर्चा होती. पक्षाने दानवे यांच्या पाठोपाठ तनवाणी यांचीही नाराजी काल दूर केली. मातोश्रीने तनवाणी यांच्या शिफारशीनुसार शहरातील जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना बढती देणारी पदे बहाल केली.
यांना मिळाली पदे:
जिल्हा समन्वयक माजी महापौर सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख गिरजाराम हळनोर, उपजिल्हाप्रमुख संतोष शेंडगे खेंडके पाटील, लक्ष्मीनारायण बाखरिया, शिवा लुंगारे, हिरा सलामपुरे, श्रीरंग आमटे पाटील, उपशहर प्रमुख नारायण जाधव, मोहसीन खान, उत्तम अंभोरे आणि खुलताबाद शहर प्रमुखपदी विष्णू फुलारे आदींचा यात समावेश आहे.