शिक्षणक्षेत्रात खळबळ! पुरस्कार मिळालेल्या शाळेच्या मुख्याध्यापकास तांदुळ चोरताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:44 PM2024-09-06T13:44:51+5:302024-09-06T13:50:58+5:30

शिक्षकदिनाच्या आदल्या रात्री ग्रामस्थांनी उघडकीस आणला प्रकार, शाळेला कुलूप ठोकल्यानंतर गुन्हा दाखल

An award-winning school principal caught red-handed stealing rice from school | शिक्षणक्षेत्रात खळबळ! पुरस्कार मिळालेल्या शाळेच्या मुख्याध्यापकास तांदुळ चोरताना पकडले

शिक्षणक्षेत्रात खळबळ! पुरस्कार मिळालेल्या शाळेच्या मुख्याध्यापकास तांदुळ चोरताना पकडले

नाचनवेल, पिशोर : कन्नड तालुक्यातील वाकद येथील पुरस्कार मिळालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह अन्य दोघांना बुधवारी मध्यरात्री शालेय पोषण आहाराच्या तांदळाची वाहनातून चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. या मुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर हे बुधवारी रात्री ११:०० वाजता एक टेम्पो (एमएच ०३ एएच ३५०८) घेऊन शाळेजवळ आले. त्यानंतर टेम्पोमालक व चालक रमजान जमालखा पठाण व हमाल एजाज शेख बन्नू (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांना सोबत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदळाच्या ९ गोण्या (वजन अंदाजे ५ क्विंटल ५० किलो) त्यांनी टेम्पोत टाकल्या. ही बाब ग्रा. पं.चे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ धाव घेऊन टेम्पो व मुख्याध्यापकासह तिघांना पकडले. त्यानंतर पिशोर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ गावात दाखल झाले. त्यांनी टेम्पो ताब्यात घेऊन सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष विष्णू थोरात, सदस्यांनी केंद्रप्रमुखांकडे व पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी केंद्रप्रमुख भिवसिंग बिलंगे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर यांच्याविरूद्ध पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापक शेख हे दीड वर्षानंतर सेवेतून निवृत्त होणार होते.

शिक्षकदिनी मंदिरात भरली शाळा
मध्यरात्री मुख्याध्यापकाकडूनच शाळेतील तांदूळ चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेत जमले. शाळेला कुलूप ठोकून मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी. गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. असे सरपंच वंदना चिकटे यांनी सांगितले. त्यामुळे ऐन शिक्षक दिनी गावातील मंदिरात शाळा भरविण्यात आली.

जि. प.च्या पथकाकडून तपासणी
याबाबत माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषदेचे शिक्षण अधीक्षक सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. टी. शिंदे, शेलगावचे केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे, चिंचोलीचे केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ, नितीन वाघ यांचे पथक शाळेत दाखल झाले. पथकाने चौकशी केली. त्यानंतर पोषण आहाराचे रजिस्टर व दप्तर असलेल्या कपाटाला कुलूप असल्याने सर्व कपाटे सील केली. त्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला.

शाळेला मिळालेला पुरस्कार रद्द
जि. प.च्या वतीने जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शाळेचा पुरस्कार वाकद येथील शाळेला जाहीर झाला होता. परंतु, या शाळेचे मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर यांच्या चोरीचा कारनामा शिक्षक दिनाच्या पूर्वरात्रीच उघड झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच या शाळेला मिळालेला पुरस्कार जिल्हा परिषदेने रद्द केला.

Web Title: An award-winning school principal caught red-handed stealing rice from school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.