अभियंता महिलेची अशीही आवड, बनली रेल्वे पायलट; आज करणार मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:37 PM2022-03-08T14:37:31+5:302022-03-08T14:40:02+5:30
गेल्या दोन वर्षांपासून त्या असिस्टंट लोको पायलट म्हणून औरंगाबाद ते मनमाड मार्गावर मराठवाडा एक्स्प्रेसवर कर्तव्य बजावतात.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादकरांनो, दुचाकी, चारचाकी चालविणारी महिला तुम्ही पाहिली असेल...एसटी, ट्रक, रिक्षासह विमान चालविणारी महिलादेखील पाहिली असेलच ना? पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ज्या रेल्वेतून प्रवास करता, ती रेल्वेही एक महिला चालविते. ही महिला रेल्वे चालक म्हणजे औरंगाबाद-मनमाड-औरंगाबाद रेल्वे मार्गावर रेल्वेचे सारथ्य करणाऱ्या असिस्टंट लोको पायलट स्नेहल नंदकिशोर सोमवंशी. जागतिक महिला दिनी त्या मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य करणार आहेत.
स्नेहल सोमवंशी या पुणे येथील असून त्या दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत औरंगाबादेत कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण बी. ई. मेकॅनिकल झालेले आहे. लहानपणापासूनच वेगळ्या वाटेने आयुष्य जगण्याची अंगी उर्मी. उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर झाल्यानंतर रेल्वे चालक या अवघड अशा क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले. रेल्वे चालक म्हटले की पुरुष, असेच नजरेसमोर येते. परंतु हे चित्र आता बदलत आहे. असिस्टंट लोको पायलट म्हणून स्नेहल या रेल्वेत दाखल झाल्या. त्यासाठी त्यांना कुटुंबीयांचे पाठबळ मिळाले. स्वप्नांना कठीण परिश्रमाची जिद्दीची जोड देत त्या यशस्वी वाटचाल करीत आहेत.
मुख्य जबाबदारी ही लोको पायलटच पार पाडतात. पण त्यासोबत असिस्टंट लोको पायलटचीही जबाबदारी महत्त्वाची ठरते. गेल्या दोन वर्षांपासून त्या असिस्टंट लोको पायलट म्हणून औरंगाबाद ते मनमाड मार्गावर मराठवाडा एक्स्प्रेसवर कर्तव्य बजावतात. त्याबरोबर नरसापूर-नगरसोल रेल्वेही त्यांनी अनेक वेळा चालविली आहे. रेल्वेत महिलांच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे एका दिवसात महिला रेल्वेचालक ये-जा करू शकतील, अशा मार्गावरच काम दिले जाते. औरंगाबादेत असि. लोको पायलट म्हणून स्नेहल यांच्यासह स्वाती संकेश्वर आणि कल्पना धनावत हेही कार्यरत आहेत. त्यांना चीफ लोको निरीक्षक प्रेमसिंग, के. नरेंद्र, व्ही. एन. साठे, चीफ क्रू कंट्रोलर जी. व्ही. गोरे यांचे मार्गदर्शन मिळते.
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, हेच समाधान
इंजिनच्या पाठीमागील बोगींमध्ये हजारो प्रवासी असतात. त्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य, हेच प्रशिक्षणात सांगितलेले आहे. आपल्या हातून प्रवासी सेवा घडते, याचे मोठे समाधान मिळते. शिवाय स्टेशनवरील लाॅबीमध्ये दिलेली जबाबदारीही पार पाडावी लागते.
- स्नेहल सोमवंशी, असिस्टंट लोको पायलट