पोलिसांना गुंगारा देणारा अवैध दारू तस्कर मुद्देमालासह पकडला
By राम शिनगारे | Published: May 5, 2023 08:11 PM2023-05-05T20:11:55+5:302023-05-05T20:12:04+5:30
अवैध मद्य विराेधी पथकाची कारवाई : पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राहत्या घरातून अवैध देशी, विदेशी दारूची विक्री करणारा सुनील रामभाऊ डुकळे (रा. बजरंगनगर, मुकुंदवाडी) हा अनेकवेळा पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. अवैध मद्य विरोधी पथकास शुक्रवारी डुकळे हा दुचाकीवर अवैध दारूची तस्कारी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा मारून त्यास मुद्देमालासह पकडले. त्याच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ड्राय डे असतानाही डुकळे याच्या घरात १ लाख १ हजार ८२० रुपयांची अवैध दारू सापडली होती. तेव्हा त्याच्या पत्नीच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तेव्हाही सुनील डुकळे हा फरार झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रदिनी १ मे रोजी सुनील डुकहे याच्या राहत्या घरात अवैध दारूचा साठा करून ठेवला होता. त्याठिकाणी पथकाने छापा मारल्यानंतर ७१ हजार २०० रुपयांची अवैध दारूचा साठा जप्त केला होता. तेव्हा त्याचा पाहुणा राजू नागू जाधव यास पकडण्यात आले होते. त्याच्याही विरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवला. दोन्ही वेळेस सुनील हा फरार होण्यात यशस्वी झाला होता.
शुक्रवारी अवैध मद्य विरोधी पथकाचे उपनिरीक्षक रमाकांत पटारे , हवालदार महेश उगले, प्रकाश चव्हाण, मनोज चव्हाण, नितेश सुंदर्डे, जालिंदर रंधे, आरती कुसळे यांना पथकास सुनील डुकळे हा दुचाकीवरून दारूचे बॉक्स घेऊन हनुमाननगरकडून एन ४ सिडकोकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रस्त्यावर सापळा लावून सुनील डुकळे व त्याचा सहकारी अमाेल अंकुश पवार या दोघांना पकडले. या दोघांकडून १ लाख १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.