शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रेरणादायी प्रवास; अल्पावधीतच सोडवले शिक्षकांचे प्रश्न

By राम शिनगारे | Published: October 20, 2023 12:15 PM2023-10-20T12:15:12+5:302023-10-20T12:16:12+5:30

प्रश्नांची जाण अन् धाडसी निर्णयक्षमता असलेल्या शिक्षणाधिकारी

An Inspirational Journey from Teacher to Education Officer; Jayshree Chavan solved the teacher's questions in a short time | शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रेरणादायी प्रवास; अल्पावधीतच सोडवले शिक्षकांचे प्रश्न

शिक्षक ते शिक्षणाधिकारी प्रेरणादायी प्रवास; अल्पावधीतच सोडवले शिक्षकांचे प्रश्न

छत्रपती संभाजीनगर : धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, प्रश्नांची जाण असेल तर अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला जाऊ शकतो. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामांचा निपटारा केल्यावर शिक्षक अधिकाऱ्यांना डोक्यावर घेतात. हाच अनुभव अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना आला आहे. १ मार्च २०२२ रोजी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी शिक्षकांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न निकाली काढले आहेत.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर टेलिग्राम कार्यालयात कार्यरत वडिलांनी दोन्ही मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले. त्यातील मुलगी असलेल्या जयश्री चव्हाण या शिक्षण पूर्ण होताच जिल्हा परिषदेच्या गल्लेबोरगाव येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून २००१ साली रुजू झाल्या. परिश्रम घेण्याची तयारी आणि जिद्दी स्वभाव यामुळे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत उपशिक्षणाधिकारी गटातील अधिकारी म्हणून २०११ साली शिक्षण विभागातच रुजू झाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला.

शिक्षक, गटशिक्षणाधिकारी या ठिकाणच्या अनुभवातून गेल्यानंतर १ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्या. नुकताच कोरोनाचा हंगाम संपलेला होता. शिक्षकांच्या मागण्या, संस्थांचालकाच्या समस्या आदींचा डोंगर होता. प्रत्येक प्रश्नाची जाण असल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना हात घालण्यास सुरुवात केली. ते प्रश्न निकाली काढण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साथ दिली. त्यातून महिला शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी अवघ्या दीड वर्षातच आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. शासकीय जबाबदारी पार पाडतानाच दोन मुलांची आई, पत्नी, सून, मुलगी म्हणूनही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यांचे पतीही माध्यमिक शिक्षक असून, आजही सासर आणि माहेरच्या लोकांची काळजी घेण्याचे काम जयश्री चव्हाण करीत आहेत.

शिक्षकांचे हक्क दिले मिळवून
मागील दहा ते बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांची पदोन्नती, संचमान्यता, शिक्षकांचे समायोजन, चटोपाध्याय, वरिष्ठ वेतनश्रेणीबाबतचे धाडसी निर्णय घेत प्राथमिक शिक्षण विभागाची गाडी रुळावर आणली. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी अध्ययनस्तर निश्चिती, म्युझिक फाॅर चिल्ड्रन, हसत-खेळत शिक्षण, विद्यार्थी स्थलांतर, शाळाबाह्य मुलांचा शोध यासह शिक्षणात नवनवीन प्रयोग करण्याचे धाडसही जयश्री चव्हाण यांनी दाखविले आहे.

Web Title: An Inspirational Journey from Teacher to Education Officer; Jayshree Chavan solved the teacher's questions in a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.