सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 12:07 PM2022-03-29T12:07:52+5:302022-03-29T12:09:25+5:30

नवरा-बायकोमधील वादातून तिने हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

An interracial married woman committed suicide by jumping in front of a train | सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या २१ वर्षीय विवाहितेने शिवाजीनगर येथील गेट नं. ५४ येथे रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता गणेश म्हस्के (२१, रा. काबरानगर, गारखेडा) असे मृताचे नाव आहे. या युवतीने सहा महिन्यांपूर्वी गणेश म्हस्के (२३) याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. गणेश हा पत्नी, आई-वडील आणि भावासोबत काबरानगरमध्ये राहत होता. रविवारी रात्री दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. स्मिताने घर साेडले तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सकाळी जवाहरनगर पोलिसांना रेल्वेसमोर महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती परिसरातही पसरली. स्मिताचे कुटुंबीयही तेथे गेले, तेव्हा मृताची ओळख पटली. रेल्वेच्या धडकेत सर्वत्र पसरलेले मांसाचे तुकडे गोळा करून घाटी रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

ठोस कारण अस्पष्ट
सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेला असताना स्मिताने आत्महत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमधील वादातून तिने हे टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. स्मिताच्या आई-वडिलांनीही अंत्यसंस्कार होईपर्यंत कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता.

Web Title: An interracial married woman committed suicide by jumping in front of a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.