गांजाचा साठा करून विक्री करणाऱ्या वृद्धास ठोकल्या बेड्या
By राम शिनगारे | Published: December 15, 2022 09:06 PM2022-12-15T21:06:10+5:302022-12-15T21:06:20+5:30
एनडीपीएस पथकाची कारवाई : २ लाख ६२ हजारांचा १३ किलो गांजा जप्त
औरंगाबाद: देवगिरी किल्ल्याच्या समोरील प्राचीन मंदिराच्या आवारात राहात असलेल्या वृद्धाच्या घरात २ लाख ६२ हजार २०० रूपये किंमतीची १३ किलो ११० ग्रॅम एवढा गांजा एनडीपीएस पथकाने जप्त केला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
एनडीपीएसचे सहायक निरीक्षक सुधीर वाघ यांच्या पथकास मंदिराच्या परिसातील घरातुन गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बुधवारी सायंकाळी छापा मारला. तेव्हा बबन रावजी उजिवाल (७०) हा व्यक्ती आढळुन आला. घराची विभागीय न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना सोबत घेत झाडाझडती घेतली. तेव्हा घरात साठा करून ठेवलेला १३ किलो ११० ग्रॅम एवढा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत २ लाख ६२ हजार २०० रूपये असून एकुण २ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुधीर वाघ, अंमलदार मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, राजाराम वाघ, सुनिल पवार, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे, प्रयोगशाळेचे संतोष कोते, रासायनिक विश्लेषक रामेश्वर काकडे यांनी केली. अधिक तपास निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि संजय गिते करीत आहेत.
तीन दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी बबन उजीवाल यास अटक केल्यानंतर न्यायालयात दौलताबाद पोलिसांनी हजर केले. आरोपीने गांजा कोठून आणला, याविषयीची माहिती जमा करायची असल्यामुळे पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली. दरम्यान आरोपीच्या विरोधात यापुर्वीही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.