सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:04 PM2024-09-19T19:04:47+5:302024-09-19T19:05:17+5:30
मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात तणाव वाढला; मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली
सिल्लोड: सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान म्हणून उल्लेख करणाऱ्या माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता सिल्लोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील शिवाजी पुतळ्यापासून मोर्चाला दुपारी १२ वाजता सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे रूपांतर सिल्लोड तहसिल कार्यालयाजवळ सभेत झाले. मोर्चात पालकमंत्री अब्दुल सत्तार, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची उपस्थिती नव्हती. मात्र, सर्वधर्मीय नागरिक, महिला मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी दानवे यांच्या विरोधात टोकाची टीका केली. दानवेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा ,दानवे यांनी बेताल वक्तव्य थांबवावे ,सिल्लोड तालुक्याची बदनामी करू नये नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला. आजच्या निषेध मोर्चामुळे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद आता टोकाला जातांना दिसत आहे. मागण्यांचे निवेदन तहसीलदार हारून शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांना देण्यात आले.
दानवेंची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भोकरदनमध्ये लक्ष द्यावे. आम्ही सिल्लोड साभाळून घेऊ. संतोष दानवे विधानसभेत कसे निवडून येतात हे पाहतो, असे आव्हान जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे यांनी दानवे यांना दिले. तर सिल्लोड जर पाकिस्तान आहे तर रावसाहेब दानवे हे या लोकसभा मतदार संघात उभे का राहिले? त्यांना लोकसभा निवडणुकी पूर्वी येथील मतदान व बिर्याणी चालत होती. त्यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोडची आहे, मग त्यांना पाकिस्तानमधील पत्नी चालते का असा टोला सुदर्शन अग्रवाल यांनी रावसाहेब दानवे यांना लावला.
या मोर्चास नंदकिशोर सहारे, केशवराव तायडे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, श्रीरंग साळवे, राजूबाबा काळे, मारोती वराडे, संदीप मानकर, दामूअण्णा गव्हाणे, रुपेश जैस्वाल, अकिल वसईकर, ऍड योगेश पाटील, रामदास पालोदकर,सुदर्शन अग्रवाल यांनी ही मार्गदर्शन केले. याप्रसंगी अर्जुन पा. गाढे, केशवराव पा. तायडे, श्रीराम महाजन , दारासिंग चव्हाण, किशोर बलांडे , केतन काजे , बंडू पाटील शिंदे , देविदास लोखंडे, भाऊराव लोखंडे, किशोर अग्रवाल ,अशोक सूर्यवंशी, सतीश ताठे, विश्वास दाभाडे, डॉ. संजय जामकर, नाना कळम, राजेंद्र ठोंबरे, दिलीप जाधव, राजू बाबा काळे, जितसिंग करकोटक, मुरलीधरराव काळे, मधुकर गवळी, राजू देशमुख, कौतिकराव मोरे, मनोज झंवर, अनिस पठाण,शेख सलीम हुसेन, राजू गौर, सत्तार हुसेन, नाना भवर ,रईस मुजावर ,आसिफ बागवान,सयाजी वाघ, बबलू पठाण, हनिफ मुलतानी, नरसिंग चव्हाण शंकरराव खांडवे ,विशाल जाधव, गौरव सहारे ,निजाम पठाण , प्रवीण मिरकर ,संतोष खैरणार, आदींसह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.