९ वर्षांच्या चाणाक्ष मुलीने हाणून पाडला स्वत:च्या अपहरणाचा डाव, शाळेतील थरारक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 01:09 PM2022-11-26T13:09:02+5:302022-11-26T13:09:44+5:30
जिगिशा इंटरनॅशनल शाळेतील घटना : सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबाद : शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने नऊ वर्षांच्या मुलीला नावाने हाक मारीत ‘तुला घेण्यासाठी पप्पांनी पाठवले आहे, तू माझ्यासोबत चल’. त्यावर मुलीने तुम्हाला ओळखत नाही. मला घेण्यासाठी पप्पा नव्हे तर आई येते. तेव्हा त्या व्यक्तीने ‘तुझ्या पप्पाला फोनवर बोल’ असे म्हणून फोन लावला. फोनवर बोलल्यानंतर मुलीने ‘हा माझ्या पप्पांचा नंबर नाही अन् आवाजही त्यांचा नाही’, असे म्हणून शाळेच्या गेटकडे धाव घेतली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी सिडको ठाण्यात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
सिडको पोलिसांच्या माहितीनुसार सिडकाे एन ७ येथील जिगीशा इंटरनॅशनल शाळेत मानसी (नाव बदललेले आहे) चौथीच्या वर्गात शिक्षण घेते. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिची शाळा सुटली. त्यानंतर मानसी शाळेच्या गेटमधून बाहेर आली. गेटजवळ उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘मानसी’ नावाने हाक मारली. तेव्हा मानसीने तुम्ही कोण? अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने ‘तुला घेण्यासाठी तुझ्या पप्पांनी पाठवले आहे. तू माझ्यासोबत चल’, असे म्हटले. त्यावर मानसीने ‘मला पप्पा नाही तर आई घेण्यासाठी येते, तुम्हाला ओळखत नाही, तुमच्यासोबत येणार नाही’, असेही सांगितले. त्यावर त्याने फोन लावत ‘तुझ्या पप्पांशी बोल’ असे म्हणून मोबाईल दिला. मानसीने फोनवर बाेलल्यानंतर ‘हा माझ्या पप्पांचा नंबर नाही अन् त्यांचा आवाजही नाही, मी तुमच्यासोबत येणार नाही’, असे म्हणून शाळेच्या गेटकडे धाव घेतली. मुलगी आतमध्ये परत आल्यामुळे गेटवरील दोन महिलांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने अनोळखी इसम घेऊन जात होता, म्हणून परत आल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी मानसीच्या पालकांना बोलावले. मुलीच्या वडिलांनी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे.
आरोपीच्या शोधासाठी पथक
निरीक्षक संभाजी पवार यांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाला आदेश दिले आहेत. पथकाने शाळेच्या गेटवरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक रमेश राठोड करीत आहेत.