'अप टू डेट' विद्यापीठ; प्रवेशापूर्वीच परीक्षा, दीक्षांत सोहळा, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 02:06 PM2023-06-15T14:06:45+5:302023-06-15T14:07:19+5:30
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्यापूर्वीच परीक्षा केव्हा घेतल्या जाणार त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येलाच विद्यापीठ प्रशासनाने 'अकॅडमिक कॅलेंडर' जाहीर केले. त्यात परीक्षा, दीक्षांत समारंभ, युवक महोत्सवाच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकास विद्या परिषदेच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आली. अधिष्ठाता मंडळाने तयार केलेल्या वेळापत्रकात १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत हे सत्र सुरू राहील. केंद्रीय युवक महोत्सव १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान होईल. १३ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान प्रथम सत्राच्या परीक्षा होतील. ६ ते २७ नोव्हेंबर या काळात प्राध्यापकांना दिवाळीची सुटी राहतील. २८ नोव्हेंबर ते २५ एप्रिल या काळात द्वितीय सत्र असेल. २६ मार्च ते २५ एप्रिल या दरम्यान द्वितीय सत्राच्या परीक्षा होतील. २६ एप्रिल ते १४ जून या दरम्यान आगामी वर्षातील उन्हाळी सुट्या असणार आहेत. विशेष म्हणजे या वेळापत्रकात विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याचे उपकुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी कळविले आहे.
शैक्षणिकसह प्रशासकीय शिस्तीची गरज
गेल्या चार वर्षांत विद्यापीठाला शैक्षणिक व प्रशासकीय शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला यशही येत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेशापासून ते परीक्षा, निकालापर्यंत व अध्यापनापासून ते युवक महोत्सवाच्या नियोजित तारखाच तयार केल्या आहेत. या वेळापत्रकाचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करण्यात येईल.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू