छत्रपती संभाजीनगरच्या आनंद सदावर्ते यांचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश; ऑल इंडिया ९४५ रँक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:15 IST2025-04-23T16:15:24+5:302025-04-23T16:15:49+5:30
आनंद यांना तिसऱ्या प्रयत्नात ९४५ वा रँक मिळाला आहे. यापूर्वी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, यश मिळाले नव्हते.

छत्रपती संभाजीनगरच्या आनंद सदावर्ते यांचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश; ऑल इंडिया ९४५ रँक
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रहिवासी तथा श्रीनगर येथील इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च संस्थेत क्लास वन अधिकारी असलेले आनंद सरला राजेश सदावर्ते यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांना ऑल इंडिया ९४५ रँक मिळाला आहे.
आनंद सदावर्ते यांचे शालेय शिक्षण नवोदय विद्यालय, वसमत येथे झालेले आहे. त्यांनी दहावी जयभवानी हायस्कूल, तर १२ वीचे शिक्षण देवगिरी महाविद्यालयात पूर्ण केले. बारावीनंतर त्यांनी एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर काही दिवस कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर दिल्लीला जात यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्याठिकाणी आंबेडकरवादी मिशन केंद्रात सुरुवातीला अभ्यास केला. त्याशिवाय ‘बार्टी’चीही मदत मिळाली आहे. दिल्लीत काही दिवस तयारी केल्यानंतर पुण्यात अभ्यास केला. त्याठिकाणी अभ्यास करीत असतानाच केंद्रीय कृषी मंत्रालयाची परीक्षा दिली. त्यात यश मिळविले. त्याचवेळी यूपीएससीचीही तयारी सुरूच ठेवली होती. आनंद यांना तिसऱ्या प्रयत्नात ९४५ वा रँक मिळाला आहे. यापूर्वी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती. मात्र, यश मिळाले नव्हते.
वडील भूमिअभिलेखमधून निवृत्त
आनंद यांचे वडील मागील वर्षीच भूमिअभिलेख विभागातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा भाऊ जिल्ह्यातच महसूल सहायक (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना आनंद सदावर्ते म्हणाले, अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रयत्न सुरू होते. त्यात यश मिळाले आहे. मात्र, रँक कमी आल्यामुळे आणखी प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे, तरच यश मिळते.