वेताळवाडीचा दुर्लक्षित प्राचीन किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:56 PM2019-07-20T18:56:18+5:302019-07-20T19:03:46+5:30

वारसा औरंगाबादचा : अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.

Ancient fort of Wetalwadi | वेताळवाडीचा दुर्लक्षित प्राचीन किल्ला

वेताळवाडीचा दुर्लक्षित प्राचीन किल्ला

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर

पर्यटनाची  राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्राचीन वास्तूचा ऐतिहासिक ठेवा बघण्यास मिळतो. त्यातीलच एक निसर्गरम्य सोयगाव तालुक्यातील वेताळवाडीचा किल्ला होय. अनेकांना या किल्ल्याचे नाव पहिल्यांदाच ऐकल्यासारखे वाटत असेल, पण हा किल्ला किती जुना आहे याविषयी वेगवेगळे तर्क लावण्यात येतात. कारण संदर्भासाठी कोणताही शिलालेख येथे नाही, पण भग्नावस्थेतील हा किल्ला पाहिल्यावर पूर्वीच्या त्याच्या सौंदर्याची कल्पना येऊ शकते. 

अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड, नांद्रा, तालतम, सुतोंडा, राहिलगड, मस्तगड असे दुर्लक्षित गड-किल्ले आहेत. त्यातीलच एक वेताळवाडीचा किल्ला होय. यास ‘वाडीचा किल्ला’ असेही म्हणतात. सोयगावपासून अवघ्या ३ कि.मी.च्या अंतरावर वेताळवाडी गावाच्या पश्चिम, दक्षिण बाजूच्या कोपऱ्यावर हा किल्ला उभारण्यात आला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फूट (६२५ मीटर) आहे. हळद गावाकडे घाट रस्त्याने जाताना या किल्ल्याने डावीकडे अख्ख्या डोंगरालाच जणू कवेत घेतले आहे. अजिंठा रांगेतील सर्वात उंच ठिकाणावर असलेल्या या किल्ल्याला जंजाळा किल्ल्याच्या दिशेने तोंड असणारा उत्तरमुखी ‘जंजाळा दरवाजा’ हा मुख्य दरवाजा आहे.

याशिवाय पायथ्याशी असलेल्या वेताळवाडी गावाच्या दिशेने असणाऱ्या दरवाजाला ‘वाडी दरवाजा’ म्हटले जाते. सुमारे २० फूट उंचीचे हे दोन भक्कम दरवाजे या किल्ल्यात आहेत. तसेच उपदरवाजेदेखील आहेत. जिभीसारखे सहसा न पाहायला मिळणारे दुर्ग वैशिष्ट्य येथे आहे. याशिवाय कातळ कोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना, बारादरीसारखी अनोखी वास्तू, बांधील खंदक, चोर दरवाजा, सर्वात उंच भागावर कमानींनी वेढलेला एक हवामहल आहे. या हवामहलमधून पायथ्याशी असलेले गाव दिसते. दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोडी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा नजरा अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात या किल्ल्यावर सोयगावचे निसर्गरम्य वातावरण मोहित करते.

या किल्ल्याच्या परिसरात हजारो सीताफळाची झाडी आहे. येथील सीताफळ देशभर प्रसिद्ध आहेत. पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याच्या संवर्धन, देखभालीची जिमेदारी आहे. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस म्हणजेच अजिंठा लेणीच्या पाठीमागील भागात रुद्रेश्वर लेणी आहे. ज्या लोकांना किल्ले पाहण्याची, पर्यटनाची आवड आहे, असे लोक आवर्जून या किल्ल्यास भेट देत असतात. मात्र, प्रचार-प्रसाराअभावी सोयगाव तालुक्यासारखाच हा किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ निर्माण झाली आहे. अशा प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या जिल्ह्यातील हा वेताळवाडीचा किल्ला पाहण्यास नागरिकांनी अवश्य जावे. 

Web Title: Ancient fort of Wetalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.