... अन् रंगांची कुपी झाली रिती...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 08:15 PM2019-05-21T20:15:52+5:302019-05-21T20:17:01+5:30
चित्रकला एकच पण त्यातून प्रत्येकीचे स्वतंत्र परंतु सक्षम रूप प्रकर्षाने दिसून आले.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : अजिंठ्याच्या अजरामर कलाकृती, मुक्तपणे बागडल्याचा आभास निर्माण करणारी वारली चित्रे आणि निसर्गाच्या सौंदर्याची रंगांच्या माध्यमातून कागदावर केलेली प्रसन्न उधळण अशी कुंचल्यातून साकारलेली रंगांची अद्भुत दुनिया अनुभवण्याचा आनंद औरंगाबादकरांनी मागील आठवड्यात मालती आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘हेरिटेज अॅण्ड नेचर’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून घेतला. चित्रकलेच्या आवडीपायी प्रा. विजया पातुरकर, ऋतुजा अष्टुरे, मोहिनी यन्नावार आणि मनीषा कुलकर्णी या चार मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्यांनी रंगांची कुपी रसिकांपुढे रिती केली.
या चारही जणींना चित्रकला मनापासून आवडते. प्रत्येकीने चित्रकलेच्या कोणत्या ना कोणत्या अंगात विशेष प्रावीण्यही मिळविले आहे. आपापल्या कलेची जोपासना करण्यासाठी या चौघी जणी नियमितपणे चित्रे रेखाटतात, पण आजवर त्यांचा हा छंद केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित होता. आपली ही कला रसिकांपुढे आणावी अशी कल्पना या मैत्रिणींना सुचली आणि एकमेकींच्या साह्याने त्यांनी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करून या क्षेत्रात स्वत:ची आणि स्वत:च्या कलाकृतींची ओळख निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.
अजिंठ्याच्या कलाकृती आपल्याला मनापासून साद घालतात, त्यामुळे या कलाकृतींचाच विशेष अभ्यास करून आपण अजिंठा लेणीचे भावविश्व साकारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, असे चित्रकार मोहिनी यन्नावार यांनी प्रांजळपणे सांगितले. वारली ही अतिप्राचीन कलांपैकी एक़ अॅक्रेलिक रंगांमध्ये वारलीचा हा मोहक आविष्कार चितारून मनीषा कुलकर्णी यांनी वारली कलाकृतींची कित्येक मोहक रुपे साकारली. प्रत्येक रंगाप्रमाणे गुलाबाच्या फुलाचे मूळचेच देखणे असणारे रूप कसे आणखीनच फुलून येते हे पातुरकर यांच्या गुलाबपुष्प मालिकेतून कलाप्रेमींना अनुभवायला मिळाले. तसेच ऋतुजा अष्टुरे यांची आई आणि लेकरू या संकल्पनेवर आधारलेली प्राण्यांची वास्तववादी चित्रे रसिकांना भावविभोर करून गेली.
चित्रकला एकच पण त्यातून प्रत्येकीचे स्वतंत्र परंतु सक्षम रूप प्रकर्षाने दिसून आले. कलाक्षेत्रात होणारे बदल कलाप्रेमींपर्यंत पोहोचावेत आणि कलेच्या धाग्यात गुंफले गेलेले कलाकार आणि रसिक हे नाते अधिकच फु लून यावे, यासाठी अशा प्रकारची कलाप्रदर्शने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात, हे प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आले.