...अन् मध्यरात्री केला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:47 AM2018-01-13T00:47:38+5:302018-01-13T11:43:33+5:30
मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.
- राम शिनगारे
औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लढा दीर्घकाळापासून सुरू होता. राज्य मंत्रिमंडळाने १४ जानेवारी १९९४ रोजीच्या बैठकीत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. यामुळे मनपाच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच प्रवेशद्वारावरील नामविस्ताराची मोहीम फत्ते केल्याची आठवण तत्कालीन कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ऐतिहासिक लढा जोमात होता. विधिमंडळाने नामांतराचा ठराव मंजूर केलेला असतानाही त्या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, डिसेंबर १९९३ मध्ये तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक सत्यपाल सिंग (विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री) हे भेटीला आले. त्यांनी नामांतर झाल्यास विद्यापीठ आणि महाविद्यालयातील स्थिती कशी राहील, याविषयी माहिती विचारली. तेव्हा महाविद्यालये विद्यापीठ नामांतराचे स्वागतच करतील. तरीही काही परिस्थिती उद्भवल्यास आम्ही सक्षम असल्याचे सत्यपाल सिंग यांना स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत होते. नवीन वर्ष उजाडले तेव्हा नामांतराच्या हालचाली वाढल्या. उच्चशिक्षण सचिव सतत संपर्कात होते. १४ जानेवारी १९९४ रोजी सकाळी ९ वाजताच फोन खणखणला. समोरून उच्चशिक्षण सचिव लखनपाल बोलत होते. त्यांनी सांगितले की, विद्यापीठ नामविस्तार ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळेल. ही प्रत मिळताच तात्काळ अंमलबजावणी करा, अशा सूचना मिळाल्यानंतर फोन कट झाला.
यानंतर तात्काळ अधिका-यांची बैठक बोलावली. सगळ्यांना संभाव्य परिस्थितीची कल्पना देत तयार राहण्याच्या सूचना दिल्या. तेथून नामविस्ताराचे समर्थक खासदार बापूसाहेब काळदाते यांना सायंकाळी विद्यापीठात नामविस्तार साजरा करण्याचे आमंत्रण दिले. संध्याकाळपर्यंत शासन निर्णय मिळाला. तेव्हाच खा. काळदाते यांच्या उपस्थितीत दणक्यात उत्सव साजरा केला. मात्र, शहरातून अशी माहिती कळाली की, विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नामविस्तार होऊ न देण्यासाठी एक गट प्रयत्न करणार आहे. तेव्हाच निर्णय घेतला की, हे काम रातोरात करायचे. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. गोविंद घारे यांची मदत घेतली. शहर पोलीस आयुक्तांनी पुरेसे संरक्षण दिले होते. १४ जानेवारी १९९४ च्या रात्री ११ वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ हे नाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा माझ्यासह विद्यापीठातील काही अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. हे काम पहाटे ४ वाजेपर्यंत चालले. प्रवेशद्वारावर नामविस्तार झाल्यानंतरच त्या ठिकाणाहून झोपण्यासाठी घरी गेलो. रातोरात नामविस्ताराची मोहीम फत्ते केली. नामविस्ताराचे विरोधक सकाळी नामविस्तार करू न देण्यासाठी जमले. मात्र, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत सायंकाळीच नामविस्तार झालेला असल्याचे दिसून आले. नामविस्तार ही घटना माझ्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची आणि आनंदाची आहे.
देश-विदेशातून संदेश
नामविस्तार झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे संदेश देश-विदेशातून मिळाले. यात ब्रिटनचे तत्कालीन उच्चायुक्त एल. एम. सिंघवी यांनी विशेष अभिनंदन केले. यातच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विद्यापीठात येण्याचे आश्वासन दिले. यानुसार १४ एप्रिल रोजी सिंघवी यांनी विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. याशिवाय अमेरिका, युरोपच्या अनेक देशांतून संदेश आले. देशभरातून तर संदेशाचा ओघ सुरूच होता.
दोन दिवसांत स्टेशनरी बदलली
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर त्याच दिवशी मध्यरात्री नामविस्तार करण्यात आला होता. मात्र, खरे आव्हान हे विद्यापीठाच्या सर्व प्रकारच्या स्टेशनरीवर नामविस्तार करण्याचे होते. पहिल्याच दिवशी सर्व जुनी स्टेशनरी रद्द केली. नवीन स्टेशनरी दोन दिवसांत तयार केली. यासाठी सर्वच जण रात्रंदिवस काम करीत होते. विद्यापीठाच्या प्रिंटिंग प्रेसमधील मशिनरी बदलण्यात आल्या. नामविस्ताराच्या नावासह सर्व प्रकारचे अर्ज, फॉर्म तयार करू घेतले.
ख-या अर्थाने मेकओव्हर
नामविस्तारानंतरच राज्य सरकारने विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री शरद पवार यांनी विविध योजना तयार करून प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार २२ कोटी रुपयांचा कृती आराखडा राज्य सरकारकडे पाठवला. पहिल्या टप्प्यात साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यात केमिकल टेक्नॉलॉजी, पर्यावरण, पर्यटन, संगणकशास्त्र विभाग सुरू केले. विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ जागांना मंजुरी मिळाली. परीक्षा भवनाच्या इमारतीला मुहूर्त सापडला. नामविस्तारामुळे विद्यापीठ ख-या अर्थाने मेकओव्हर झाले.