...आणि दुभंगलेले ओठ जुळले; लायन्स प्लास्टिक सर्जरी शिबीर ठरते गरीब रुग्णांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 07:53 PM2018-12-15T19:53:39+5:302018-12-15T20:08:38+5:30
पहिल्या दिवशी ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना जगण्याची नवीन उमेद दिली.
औरंगाबाद : काही बालकांचे दुभंगलेले ओठ जुळले, तर एका मुलीची जुळलेली बोटे वेगळी करण्यात आली. काही बालिकांच्या चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण काढण्यात आले. ही जादू नसून अमेरिकेतून आलेल्या डॉ. राज लाला व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोटांची किमया होय. पहिल्या दिवशी ८१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांनी रुग्णांना जगण्याची नवीन उमेद दिली.
लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद- चिकलठाणाच्या वतीने ४३ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. एमजीएम हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी सकाळी ७ वाजेपासून रुग्ण व त्यांचे नातेवाईक हजर झाले होते. पहिल्या दिवशी लहान मुलांच्या शस्त्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले. ८१ रुग्णांपैकी ३० रुग्ण हे ० ते १० वर्ष वयोगटातील होते. दिलेल्या नंबरनुसारच रुग्णांना आॅपरेशन थिएटरमध्ये पाठविण्यात येत होते. सर्व नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करण्यात आली होती. हर्सूल येथील अवघ्या ६ वर्षांच्या बुशिरा शेख या मुलीचे दुभंगलेले ओठ शस्त्रक्रियेने जुळविण्यात आले, तर रिसोड येथून आलेल्या श्रद्धा सुरसे या मुुलीच्या उजव्या हाताची दोन बोटे जन्मजात एकमेकांना चिकटलेली होती. डॉक्टरांनी तिची चिकटलेली बोटे वेगळी केली.
तसेच अकोला जिल्ह्यातील कोमल देवकर व जालना येथून आलेल्या राखी गाडेकर या मुलीच्या चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. चिखली येथून आलेल्या ५ वर्षांच्या शिवानी राठोडच्या चेहऱ्यावरील मस काढण्यात आली. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या शस्त्रक्रिया रात्री ७.३० वाजेपर्यंत सुरू होत्या. डॉ. राज लाला, डॉ. संजय लाला, डॉ. ओम अग्रवाल यांच्यासह अन्य डॉक्टरांनी न थकता ११.३० तास उभे राहून ८१ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वीतेमुळे रुग्णांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. शिबीर यशस्वीतेसाठी लायन्सचे अध्यक्ष सुरेश साकला, प्रकल्प प्रमुख राजेश लहुरीकर, सचिव डॉ. मनोहर अग्रवाल, प्रकाश राठी, राजकुमार टिबडीवाला, जयकुमार थानवी, भूषण जोशी, सुनील लोया, कल्याणी शुक्ला, भारत भालेराव आदी परिश्रम घेत आहेत.
शिबिरात गुजरात, मध्यप्रदेशातून रुग्ण
लायन्सच्या प्लास्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारी मराठवाड्यासह धुळे, नंदुरबार, अकोला एवढेच नव्हे गुजरात, मध्यप्रदेशातून रुग्ण शहरात आले आहेत. या शिबिराची ख्याती देशभर पसरल्याची ही पोहोच पावती होय.