अन् ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी जाधवांना खांद्यावर उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:46 AM2019-05-24T00:46:28+5:302019-05-24T00:46:43+5:30
हर्षवर्धन जाधव हे मतमोजणी केंद्रातून समर्र्थकांसह वाहनाकडे जात असताना ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत त्यांना खांद्यावर उचलून घेतले. प्रत्येक कार्यकर्ता त्यांचे अभिनंदन करताना दिसून आला. या अभिनंदनाचाही जाधव यांनी स्वीकार केला.
औरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव यांनी २५ व्या फेरीनंतर आपला पराभव मान्य करत मतमोजणी केंद्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जाधव हे मतमोजणी केंद्रातून समर्र्थकांसह वाहनाकडे जात असताना ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत त्यांना खांद्यावर उचलून घेतले. प्रत्येक कार्यकर्ता त्यांचे अभिनंदन करताना दिसून आला. या अभिनंदनाचाही जाधव यांनी स्वीकार केला.
शिवसेनेचे विद्यमान खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेनेचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी स्वतंत्र पक्ष काढत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचारामध्येही त्यांनी जोर लावत तीन लाखांच्या जवळपास मते घेतल्यामुळे ‘एमआयएम’चे आ. इम्तियाज जलील यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. याची जाणीव ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांना असल्यामुळे जाधव हे बाहेर येताच त्यांना गराडा घालण्यात आला.
तेव्हा जाधव यांनीही व्हिक्टरीचे चिन्ह दाखवले. तेव्हा एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या नावाने घोषणाबाजी केली. खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. तेथून जाधव हे स्वत:च्या वाहनाकडे जात असताना एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा गराडा कायम होता. वाहन सुरू केल्यानंतर अनेकजण त्यांची गाडी थांबवून अभिनंदन करत होते. जालना रोडवर आल्यानंतरही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी वाहन थांबवून त्यांचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले. यात युवकांचा उत्साह अतिशय वाखाणण्याजोगा होता.