Marathawada Muktisangram Din :...अन् पोलिसांनी नालदार बुटाच्या टापांनी तुडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:09 AM2018-09-17T00:09:44+5:302018-09-17T00:17:14+5:30

हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ७ आॅगस्ट १९४८ रोजी पुकारलेल्या आंदोलनात माणिकचंद पहाडे सत्याग्रहासाठी गुलमंडीवर तोंडाला कपडा गुंडाळून लपून-छपून पोहोचले. सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा होता. तोंडावरचे कपडा काढताच पहाडेंनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेसमोर घोषणाबाजी करीत पत्रक वाचण्यास सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्यावर रझाकार पोलिसांनी झडप मारून खाली पाडत नालदार बुटाच्या टापांनी तुडविण्यास सुरुवात केली. तरीही त्यांनी आपल्या हाती असलेला तिरंगा खाली पडू दिला नाही. अशा अवस्थेतच त्यांना अटक झाली. हा दुर्लक्षित इतिहास आता पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

... and the police trampled with stormy boots | Marathawada Muktisangram Din :...अन् पोलिसांनी नालदार बुटाच्या टापांनी तुडविले

Marathawada Muktisangram Din :...अन् पोलिसांनी नालदार बुटाच्या टापांनी तुडविले

googlenewsNext
ठळक मुद्देहैदराबाद मुक्तिसंग्राम दिन विशेष : गुलमंडीवरील ७ आॅगस्टचा सत्याग्रह; माणिकचंद पहाडे यांचा लढा पुस्तकरूपात; लढ्यातील विविध घटनांचा उलगडा

- राम शिनगारे 

औरंगाबाद : हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ७ आॅगस्ट १९४८ रोजी पुकारलेल्या आंदोलनात माणिकचंद पहाडे सत्याग्रहासाठी गुलमंडीवर तोंडाला कपडा गुंडाळून लपून-छपून पोहोचले. सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा होता. तोंडावरचे कपडा काढताच पहाडेंनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनतेसमोर घोषणाबाजी करीत पत्रक वाचण्यास सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्यावर रझाकार पोलिसांनी झडप मारून खाली पाडत नालदार बुटाच्या टापांनी तुडविण्यास सुरुवात केली. तरीही त्यांनी आपल्या हाती असलेला तिरंगा खाली पडू दिला नाही. अशा अवस्थेतच त्यांना अटक झाली. हा दुर्लक्षित इतिहास आता पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.

देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. हैदराबाद संस्थानात निजामाचे शासन असल्यामुळे हा भाग पारतंत्र्यातच होता. संघराज्यात सामील होण्यासाठीची चळवळ जोमात होती. ७ आॅगस्ट १९४८ रोजी संस्थानात सगळीकडे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी ७ आॅगस्ट रोजी संस्थानात शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक ठिकाणच्या सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांची निवड केली. माणिकचंद पहाडे यांना औरंगाबादेतील गुलमंडीवर सत्याग्रह करण्याचे आदेश दिले. आंदोलनाचा दिवस उजाडला. पोलिसांनी माणिकचंद पहाडे यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. पहाडेंना ‘जिल्हाबंदी’ केली, तसेच हैदराबादहून ‘जिंदा या मूर्दा’ पकडण्याचे आदेश मिळाले होते.

शंकरलाल पटेल यांनी पहाडे यांना चिकलठाणा रेल्वेस्थानकावरून मोठ्या शिताफीने चिकलठाणा गावात आणले. तेथून स्मशानमारुतीमार्गे ढोरपऱ्यातून जुना मोंढा, खाराकुँआ या गल्लीबोळांतून लपत-छपत केळीबाजारच्या कोप-यावरील तुकारामपंत देव वकील यांच्या घरापर्यंत आणले. तेथे दोन तास थांबल्यानंतर पोलिसांना पहाडे या इमारतीत असल्याची कुणकुण लागली, तेव्हा पोलिसांनी घराला वेढा दिला. पोलीस घरात शिरेपर्यंत पहाडे पाठीमागच्या दाराने अडीच फुटाच्या भंगी बोळीतून गट्टानी इमारतीकडे गेले. तेथून थेट गुलमंडीवर पोहोचले. शहरातील हजारो नागरिक त्यांची गुलमंडीवर येण्याची वाट पाहत होते. तोंडाला शाल गुंडाळलेली होती. डॉ. सीमंत यांच्या गुलमंडी चौकातील ओट्यावर येऊन तोंडावरची शाल काढत ‘महात्मा गांधी की जय, हैदराबाद स्टेट काँग्रेस जिंदाबाद’च्या घोषणा सुरू केल्या.

पहाडे यांना पाहताच हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समोरच्या इमारतीजवळून रघुनाथ भाले यांनीही घोषणा सुरू केल्या. पहाडे यांनी हातात असलेले पत्रक वाचण्यास सुरुवात केली. अर्धे पत्रक वाचलेले असतानाच रझाकार पोलिसाने कमरेत लाथ मारली. ते ओट्यावरून खाली पडले. खाली पडल्यानंतर पोलिसांनी नालदार बुटाच्या टापांनी तुडवण्यास सुरुवात केली. हातातील तिरंगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सगळे अंग रक्तबंबाळ झाले तरी त्यांनी तिरंगा सोडला नाही. घोषणा देणारे रघुनाथ भाले यांनाही पोलिसांनी खूप मारले. दोघांना मारतमारतच व्हॅनमध्ये बसवून अटक केली. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ दुसºया दिवशी औरंगाबाद जिल्ह्यासह शहर बंद ठेवले होते.

कोण होते पहाडे
माणिकचंद पहाडे यांचा जन्म जैन कुटुंबात झाला. बालपणातच त्यांना अहिंसेची शिकवण मिळाली होती. पुढे महात्मा गांधी यांचे अनुयायी म्हणूनच त्यांनी कार्य केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ते ज्येष्ठ नेते होते. गोविंदभाई श्रॉफ यांच्या अगोदरपासून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. पुढे स्वातंत्र्यानंतरही १९५२ साली फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करीत होते, तेव्हा पहाडे बाबासाहेबांना नियमितपणे भेटायला जात असत आणि त्यांच्याशी शिक्षण प्रसार-प्रचाराविषयी चर्चा होत असल्याचेही संदर्भ ‘हैदराबाद मुक्तिसंग्रामातील माणिक’ या ग्रंथात देण्यात आले आहेत. या ग्रंथाची तिसरी आवृत्ती ३१ आॅगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झाली आहे.

पहाडे यांना अनुल्लेखाने संपविण्याचा प्रयत्न 
माणिकचंद पहाडे यांना त्यांच्या पश्चात अनुल्लेखाने संपविण्याचा प्रयत्न काही तथाकथित देशभक्तांनी आणि त्यांच्या खुशमस्कऱ्यांनी केला; पण इतिहासात घडलेल्या घटनांची नोंद सत्य असते. त्या घटना जशाच्या तशा शब्दबद्ध व्हावयास हव्या होत्या. शासनाने प्रकाशित केलेला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास असो, की महापालिकेने उभारलेल्या हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाच्या स्मारकात आद्यसेनानीचे नाव टाळण्याचे किंवा दुय्यम स्थानावर ठेवण्याचे काम केले आहे. हे कुजक्या मानसिकतेचे द्योतक आहे. हा इतिहास पुन्हा एकदा ग्रंथरूपाने समोर आला. याचा आनंद आहे.
- डॉ. एम.ए. वाहूळ, सेवानिवृत्त प्राचार्य.

Web Title: ... and the police trampled with stormy boots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.