...अन् शाळेतील विद्यार्थी करतात जंगलाचा वाढदिवस साजरा
By राम शिनगारे | Published: September 5, 2023 08:27 PM2023-09-05T20:27:13+5:302023-09-05T20:28:16+5:30
गणोरीच्या जि.प. शाळेची यशोगाथा : अत्याधुनिक शिक्षण देणारी उपक्रमशील शाळा
छत्रपती संभाजीनगर : होय, शाळेतील विद्यार्थी चक्क जंगलाचा वाढदिवस साजरा करतात. हे जंगलच विद्यार्थ्यांनी उभारलेय. शाळेच्या प्रांगणात ७०० देशी झाडांचे ''डेंस फॉरेस्ट''च घनदाट जंगल वाढलेय. त्याशिवाय परिसरातील लावलेल्या ५०० झाडांचे क्यूआर कोडिंगही केले जात आहे. हे सर्व घडत आहे फुलंब्री तालुक्यातील गणोरीच्या जि.प. प्रशालेत.
येथे पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेची पटसंख्या ६३६. शाळेत रोबोटिक्स, मॅथ लॅब, एपीजे अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेशन केंद्र, विशेष म्हणजे वारली चित्रकला संवर्धन, जतन केंद्रही आहे. पर्यावरण संवर्धनाचे बाळकडू प्रत्येक विद्यार्थ्यास मिळते. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा घेतली जाते. प्लास्टिक कचरामुक्त शाळा, बंद बाटल्याचे ट्री गार्ड बनवून पुनर्वापर केला जातो. त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळतो. नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षणाच्या ओळखीसाठी ऑटोमोबाइल टेक्निशियन, मल्टिस्किल फाउंडेशनचे वर्कशॉप उभारले आहेत. मुलींच्या आरोग्यासाठी पॅड बँक असून, सॅनिटरी पॅड डिस्पेंसिंग आणि इन्सिनेशनसाठी चार उपकरणे बसवली आहेत. तीन वर्षांपासून शाळेत मुक्तिसंग्रामावर ७५ विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. गांधी विचार संस्कार परीक्षा, चित्रकला परीक्षेसोबतच एनएमएमएस, एनटीएस, एमटीएस, होमी भाभा, विज्ञान मंथन, शिष्यवृत्ती आणि नवोदय या शासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. लोकशाही पद्धतीने शाळेत विद्यार्थी संसदेच्या निवडणुकाही घेतल्या जातात, अशी माहिती मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी दिली.
विद्यार्थीच चालवतात मीडिया सेंटर
शाळेतील विद्यार्थीच मीडिया केंद्राच्या माध्यमातून नियतकालिक, यूट्यूबवर शाळेच्या बातम्यांचे प्रसारण करतात. आठवडी बाजाराच्या दिवशी नामवंतांची विद्यार्थी मुलाखतही घेतात. ही मुलाखत शाळेच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह असते. या उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास आणि प्रश्न विचारण्याचे कौशल्य वाढल्यामुळे मुख्याध्यापक सांगतात.
उपक्रमांच्या माध्यमातून संधी
शहरांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थ्यांना अभावाच्या संघर्षाला सामोरे जावे लागते. उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीच्या संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांना ग्रामपंचायत, शाळा समिती, पालकांचे उत्तम सहकार्य मिळते.
-अनिल देशमुख, मुख्याध्यापक