...अन् वसतिगृहाच्या वाॅर्डनने मागितली विद्यार्थिनींची माफी

By विजय सरवदे | Published: September 19, 2023 08:04 PM2023-09-19T20:04:42+5:302023-09-19T20:05:07+5:30

‘लोकमत इम्पॅक्ट’निर्वाह भत्ता वाटप : तातडीने पुरेसे पाणी, चांगले जेवणही झाले सुरू

...and the warden of the Govt girls hostel apologized to the students | ...अन् वसतिगृहाच्या वाॅर्डनने मागितली विद्यार्थिनींची माफी

...अन् वसतिगृहाच्या वाॅर्डनने मागितली विद्यार्थिनींची माफी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : समाज कल्याण विभागाच्या पुष्पनगरी येथील मुलींच्या वसतिगृहातील असुविधा आणि वॉर्डनकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल ‘लोकमत’ने १६ सप्टेंबरच्या अंकात ‘मुलींचे वसतिगृह नव्हे, छळछावणीच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर लगोलग समाज कल्याण विभागाची यंत्रणा हालली. या वसतिगृहासाठी पुरेसा पाणीपुरवठा, उत्कृष्ट जेवण, ताजी फळे एवढेच नव्हे, तर मुलींना ताबडतोब एक महिन्याचा निर्वाह भत्ताही वितरित करण्यात आला.

योगायोगाने १६ सप्टेंबर रोजी शहरात मंत्रिमंडळाची बैठक होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व विभागांचे मंत्री, सचिवांचा लवाजमा शहरात होता. त्यात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी समाज कल्याण विभागाची लक्तरे टांगणारी होती. यासंदर्भात शहरात आलेल्या वरिष्ठांनी स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यामुळे रात्रीच साधारणपणे ८ वाजेच्या सुमारास प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी पुष्पनगरी येथील मुलींच्या वसतिगृहाकडे धाव घेतली. रात्रीच्या वेळी कधीही न थांबणाऱ्या वार्डन सुनीता थिटे यादेखील वसतिगृहात आल्या आणि मुलींना विश्वास दिला की, माझ्याकडून अनवधानाने काही शब्द निघाले असतील, तर मी माफी मागते. सोनकवडे यांनी यापुढे असुविधांचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास मुलींना दिला. एवढेच नाही, तर जानेवारीपासून थकलेल्या निर्वाह भत्त्यापैकी एका महिन्याचा भत्ता तत्काळ अदा केला.

पाणी, जेवण, फळांत फाळका
शासकीय नियमानुसार वसतिगृहातील मुलींना पुरेसे पाणी, उत्कृष्ट जेवण, ताजी फळे दिली जातात. मात्र, या वसतिगृहात यामध्ये फाळका मारण्यात येत असून, दोनऐवजी एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा, शिळी व सडकी फळे तसेच निकृष्ट जेवण दिले जात होते. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर या सर्व गोष्टींमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली.

 

Web Title: ...and the warden of the Govt girls hostel apologized to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.