अन् ‘त्या’ चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वे थांबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:46 AM2018-05-04T00:46:50+5:302018-05-04T10:50:56+5:30
एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती.
लासूर स्टेशन : एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती.
झाले असे की, जयपूर येथील मुकेश शर्मा हे पत्नी सुषमा व मुलगा रुद्र (२) यांच्यासह या रेल्वेने औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे लग्न समारंभासाठी येत होते. मात्र बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता रुद्रला प्रवासातच अचानक ताप आला. पाहता पाहता हा ताप शंभरच्या पुढे गेला आणि रुद्रला झटके येऊ लागले. हे बघून त्याची आई घाबरून रडू लागली. सर्वच प्रवासी त्यांच्याजवळ जमा झाले. त्याच कोचमध्ये तिकीट तपासणी करणारे आशिषकुमार यांनी या घटनेची माहिती नांदेड रेल्वे नियंत्रण कक्षला दिली. रेल्वे नियंत्रण कक्षाने सर्वच रेल्वे स्टेशनला डॉक्टर उपलब्ध होतील, का अशी विचारणा केली.
परंतु, डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे कळताच औरंगाबाद येथे रेल्वे नियंत्रण कक्षचे प्रमुख मनोज तिवारी यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे अरविंद शर्मा यांना औरंगाबाद येथे डॉक्टर उपलब्ध करावे, असे सांगितले. शर्मा यांनी तात्काळ दिलीप कांबळे यांना यांची माहिती दिली. कांबळे यांनी लगेचच रुद्रवर उपचारासाठी डॉक्टरची टीम व रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमाणी यांना पाठवले. दरम्यान, ही रेल्वे लासूर स्टेशन येथे थांबत नाही, हे माहित असल्याने सोमाणी यांनी नांदेड- सिकंदराबाद येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर नांदेड नियंत्रण कक्षाचे मनोज तिवारी यांना ही रेल्वे थांबविण्याची परवानगी देण्यात आली. सोमाणी यांनी डॉ. तुषार विसपुते यांच्यासह रेल्वे सेना सदस्य मनीष मुथा, इस्माईल भारतवाला, स्टेशन मास्टर विजय लहरे यांना कळवून टीम तयार ठेवली. रेल्वे लासूरला थांबताच डॉ. तुषार विसपुते यांनी रुद्रवर तातडीचे उपचार केले आणि त्याचा जीव वाचविला. त्यानंतर पाच मिनिटातच रेल्वे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाली. रुद्रच्या आई -वडीलांनी रेल्वे अधिकारी, प्रवासी, सोमाणी व डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी रुद्रच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.