घरात घुसून पेटविलेल्या अंधारीमधील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:40 PM2020-02-06T12:40:05+5:302020-02-06T12:52:00+5:30
गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत महिलेस औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
औरंगाबाद : अंधारी (ता. सिल्लोड) येथे घरात घुसून रॉकेल टाकून पेटविलेल्या महिलेचा उपचार सुरू असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्या महिलेस पेटविले होते.
संगीता प्रभाकर कांबळे (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगीता घरात आराम करीत असताना आरोपी संतोष सखाराम मोहिते याने संगीताचे दार ठोठावले. दार उघडताच आरोपी बळजबरीने तिच्या घरात घुसला. संगीताने त्यास घरातून बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर आरोपीने वाद घालून अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
या घटनेत गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत संगीतास औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून वॉर्ड क्रमांक २२/२३ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोजनी जाधव, डॉ. बीडकर हे तिच्यावर उपचार करीत होते. संगीता ९५ टक्के जळालेली असल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी डॉक्टरांसमक्ष तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला होता. त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष मोहितेविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बुधवारी सायंकाळपासून संगीताचा श्वास मंदावला होता. डॉक्टर तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज संपली. संगीता यांच्या मृत्यूची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.
अंधारीत तणावपूर्ण शांतता
सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे महिलेच्या घरात घुसून आरोपीने रॉकेलने पेटवून दिल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर बुधवारी गावात तणावपूर्ण शांतता होती. पोलीस अधीक्षकांनी गावात भेट देऊन आरोपीविरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या. अंधारी येथे रविवारी रात्री आरोपी संतोष सखाराम मोहिते (४०, रा. अंधारी) याने एका महिलेच्या घरात घुसून रॉकेल टाकून तिला जाळले होते. त्यात ती ९५ टक्के जळाली असून, सध्या घाटीत उपचार सुरू आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, सदर आरोपीला फाशी देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, सदर आरोपी गावातील महिलांना जबरदस्ती करीत होता. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी कुणीही वाच्यता करीत नव्हते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.दरम्यान, बुधवारी सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात बुधवारी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध सिल्लोड न्यायालयात लवकरच दोषारोपपत्र दाखल करावे, अशा सूचना पोलिसांना दिल्या.
गुरुवारी सकाळी होणार शवविच्छेदन
गुरुवारी सकाळी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केले जाईल. यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या माहेरी अंधारी येथे नेण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवा - खासदार इम्तियाज जलील यांची लोकसभेत मागणी
वर्ध्याच्या हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर दोनच दिवसांनी सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात महिलेला जिवंत जाळण्यात आल्याचे नमूद करीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंधारीतील जळीत महिला घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी लोकसभेत केली.