कुपोषणमुक्तीसाठी आंध्रचे ‘पोषण मिशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:16 PM2019-07-13T18:16:41+5:302019-07-13T18:20:06+5:30
बालमृत्यू कमी होण्यासोबतच महिला-बालकांचे आरोग्यही सुधारले
- गजानन दिवाण
औरंगाबाद : गरोदरपणापासून ते बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत माता आणि बालकाचा आहार सुधारण्यासाठी आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आलेल्या ‘पोषण मिशन’चे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. बालमृत्यू कमी होण्यासोबतच महिला आणि बालकांच्या आरोग्याचे प्रश्नही मार्गी लावण्यात आंध्र सरकारला यश आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने युनिसेफच्या सहकार्यातून सुरू केलेले हे ‘पोषण मिशन’ महिला-बालकांसाठी ‘संधीची खिडकी’ म्हणूनही ओळखले गेले. या संधीच्या खिडकीतून बालक आणि मातांना एक हजार दिवस आहार दिला जातो. या हजार दिवसाची सुरुवात महिलेच्या गर्भधारणेपासून होते आणि समारोप बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसाला होतो. या माध्यमातून दहा वर्षांत राज्य कुपोमुक्त करण्याचे ध्येय आंध्र सरकारने ठेवले आहे. सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या काळातच ५.७१ गरोदर स्त्रियांना अण्णा अमृता हस्थम योजनेंतर्गत ५५ हजार ६०७ केंद्रांमधून एक वेळचे पूर्ण जेवण देण्यात आले. पुढे राज्यभर हा कार्यक्रम राबविण्यात आला. शिवाय आयसीडीएस प्रोग्राम अंतर्गत सहा वर्षांखालील मुले, गरोदर, स्तनदा मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी पाळणाघरे असतातच. शिवाय अंगणवाडीतील पोषण आहार घेऊन तेथील ताई कामाच्या ठिकाणी हजर होत असतात. त्यामुळे रोहयोवर आईसोबत आलेले बालक पोषण आहारापासून वंचित राहत नाही.
सरकारतर्फे कुपोषित मुलांना गोरू कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त अन्न दिले जाते. याचा लाभ राज्यातील २४ दुर्गम पट्ट्यातील एक लाख ३३ हजार ७३३ मुलांना होतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे २०१५-१६ नुसार, सहा वर्षांखालील तब्बल ७६ टक्के मुलांनी या सुविधांचा लाभ घेतला. पोषक आहार ६९ टक्के, वाढीच्या नोंदी ६६ टक्के, वैद्यकीय तपासणी ६० टक्के, टीकाकरण ५६ टक्के आणि तब्बल ७३ टक्के मातांनी अंगणवाडीतार्इंकडून मार्गदर्शन घेतले. पाच वर्षांमध्ये आंध्र प्रदेशात दोनतृतीयांश मुलांचा जन्म आरोग्य सुविधांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली झाला. हे प्रमाण ९२ टक्के इतके होते. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, एक वर्षाखालील बालमृत्यूचे हजारामागे २००५-०६ साली ५४ असलेले प्रमाण २०१५-१६ ला ३५पर्यंत खाली आले. पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण ६३ वरून ४१ पर्यंत खाली आले.
४३%
पाच वर्षांखालील मुले २००५-०६ साली वाढ कमी झालेले होते. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण कमी होऊन ३१ टक्क्यांवर आले.
........................
९२%
मुलांचा जन्म गेल्या पाच वर्षांमध्ये वैद्यकीय सुविधांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली झाला.
बालमृत्यू घटले
२०१५-१६ - एक वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण हजारामागे - ३५
पाचवर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हजारामागे - ४१
२००५-०६ - एक वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण हजारामागे - ५४
पाचवर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण हजारामागे - ६३
(स्त्रोत - नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे)