भुलीचे इंजेक्शन कालबाह्य अन् वन विभागाला गुंगी; माकडाच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम कुठेय?
By साहेबराव हिवराळे | Published: November 29, 2023 07:53 PM2023-11-29T19:53:05+5:302023-11-29T19:53:18+5:30
वाळूज औद्योगिक परिसरामध्ये वेदनेने विव्हळत असलेल्या माकडाला वाचविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही.
छत्रपती संभाजीनगर : वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी भूल देण्याकरिता असलेले इंजेक्शन कालबाह्य झाले असून, मदतीला येणारी रेस्क्यू टीम ‘नॉट रिचेबल’ झाली आहे. वाळूज औद्योगिक परिसरामध्ये वेदनेने विव्हळत असलेल्या माकडाला वाचविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नाही.
एमआयडीसी वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये बुधवारी दुपारी आपल्या कंपनीत घुसलेल्या जखमी माकडाला पाहून उद्योजक घाबरला आणि तो वर्कशॉपमधून बाहेर पडायला लागला. त्यावेळी या वन्य जिवाने आधी त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत असल्यामुळे ते वेदनेने विव्हळत होते. त्यास पाणी, केळी आणि बिस्कीट दिली. वेदनेतून तो मदतीची याचना या उद्योजकाकडे करत होता. समाजसेवी संघटना तसेच वन विभागास फोन करूनही कोणी फिरकले नाही. अखेर सायंकाळी अंधारात माकड जखमी अवस्थेत निघून गेले.
वाहने देखभाल - दुरुस्तीअभावी पडून
शहर परिसर तसेच ग्रामीण परिसरामध्ये अशी घटना समजल्यास वन विभागाने दोन वर्षांपूर्वी रेस्क्यू टीम तयार केली होती. त्यांना वाहने व आपत्तीप्रसंगी लागणारे साहित्य विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली होते. यातील काही जणांची वन विभागाने कामे काढून घेतली आहेत, तर वाहने जुनी होऊन देखभाल - दुरुस्तीअभावी पडून आहेत.
-आदी गुडे, वन्यजीव अभ्यासक
वन्य प्राण्यांच्या मदतीला कोणी आलेच नाही....
जखमी वानराच्या मदतीला अखेरपर्यंत कुणीही आले नाही. बराच वेळ समाजसेवी संघटनेचे जयेश शिंदे हे यासाठी प्रयत्न करीत होते.
-किशोर सूर्यवंशी
मग पथकाचा उपयोग काय?
अधिकाऱ्यांना कळवूनही जर मदतीची भावना नसेल या पथकाचा उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. यासाठी समाजसेवी संघटना काम करतात. त्यांनीही वेळीच मदत करणे गरजेचे आहे. याविषयी वरिष्ठांकडे बैठकीमध्ये प्रश्न मांडणार आहोत.
-मानद वन्यजीव सदस्य डॉ. किशोर पाठक
काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
वन विभागातील रेस्क्यू पथकात चार-पाच कर्मचाऱ्यांना जखमी प्राण्यांना किंवा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या प्राण्यास पकडून जंगलात सोडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले..