अंगणवाडी मुख्य सेविकांना मिळणार प्रशिक्षण..!
By Admin | Published: February 5, 2017 11:35 PM2017-02-05T23:35:33+5:302017-02-05T23:38:50+5:30
जालना : राजमाता जिजाऊ मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र आता अहमदनगरहून जालना येथे स्थलांतरित झाले आहे
जालना : राजमाता जिजाऊ मध्यमस्तर प्रशिक्षण केंद्र आता अहमदनगरहून जालना येथे स्थलांतरित झाले आहे. अंगणवाड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिकांना या केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे मराठवाड्याचे एकमेव प्रशिक्षण केंद्र जालन्यात सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शासनाने हा आदेश काढला.
महिला व बाल विकास विभागाकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना राबविण्यात येते. अंगणवाड्यांत नियुक्त करण्यात येणाऱ्या मुख्यसेविका तसेच पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण देण्यासाठी मध्यमस्तर केंद्र कार्यरत आहे. पूर्वी हे केंद्र अहमदनगर येथे होते. त्यामुळे मराठवाड्यातील सेविकांना तेथे जाणे गैरसोयीचे ठरत होते. गैरसोय लक्षात घेता शासनाने हे केंद्र जालना येथील कर्मवीर प्रतिष्ठान संस्थेच्या आवारात हे केंद्र स्थलांतरित केले आहे. या केंद्रात आता मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील मुख्य सेविका व पर्यवेक्षिकांना जालना येथे प्रशिक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यात १९०० पेक्षा अधिक अंगणवाड्या आहेत. त्यात ७० मुख्य सेविका आहेत. यांना वेळोवेळी दिले जाणारे प्रशिक्षण आता जालन्यात मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार म्हणाल्या, सदर केंद्र जालना येथे स्थलांतरित झाले आहे. जिल्ह्यासाठी ही महत्वाची बाब असून, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पदनिर्मिती शासन करणार असून, या संबंधीची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. केंद्रासाठी विशेष निधीची तरतूद असून, केंद्रातून प्रशिक्षण देण्याचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)