अंगणवाड्यांमध्ये आता ‘एक घास चिऊला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:04 AM2021-03-17T04:04:17+5:302021-03-17T04:04:17+5:30

फुलंब्री : ‘पहिला घास चिऊला, नंतर माझ्या बाळाला’ असे शब्द ग्रामीण भागात आई आपल्या चिमुकल्याला घास भरविताना पूर्वी उच्चारीत ...

Anganwadis now have 'Ek Ghas Chiula' | अंगणवाड्यांमध्ये आता ‘एक घास चिऊला’

अंगणवाड्यांमध्ये आता ‘एक घास चिऊला’

googlenewsNext

फुलंब्री : ‘पहिला घास चिऊला, नंतर माझ्या बाळाला’ असे शब्द ग्रामीण भागात आई आपल्या चिमुकल्याला घास भरविताना पूर्वी उच्चारीत असे. यामुळे बाळही आनंदाने जेवण संपवीत असे. आता असाच ‘एक घास चिऊला’ हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेचे एकात्मिक बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या कल्पनेतून ग्रामीण भागातील अंगणवाड्यांत राबविणे सुरू झाले आहे. यात बालकांसह चिमण्यांनाही आधार मिळत असून पर्यावरणाचे रक्षण होत आहे.

चिमण्यांच्या किलबिलाटात बालकेही आनंदात राहतात. असे निसर्गरम्य वातावरण बालकांना मिळावे, याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी ‘एक घास चिऊला’ हा उपक्रम सुरू केला आहे. सुमारे २०० अंगणवाड्यांत हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीसमोर चिमण्यांकरिता अन्नपाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एकीकडे अंगणवाडीमध्ये बालकांना सकस आहार देऊन त्यांना शिक्षणही दिले जाते, तर दुसरीकडे अंगणवाडीसमोरच पक्षांचाही विचार करून त्यांनाही अन्नपाणी मिळावे म्हणून व्यवस्था केली जात आहे. इमारतीमध्ये चिमुकल्या बालकांचा तर बाहेर चिमण्यांचा आवाज घुमत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नामशेष होणाऱ्या चिमण्यांचे संगोपण

पूर्वी मोठ्या संख्येने अंगणात आढळणाऱ्या चिमण्या मध्यंतरी नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे चिमण्यांचे प्रमाण वाढणार आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने आता अंगणवाडीसमोर दाणापाण्याची व्यवस्था होत असल्याने पक्षांना आधार मिळणार आहे.

कोट

‘एक घास चिऊचा’ हा उपक्रम राबविला जात असून गणोरी सर्कलमधील सर्वच अंगणवाड्यांच्या दारावर पक्षांसाठी पिण्याचे पाणी व अन्न दररोज उपलब्ध करून दिले जात आहे. हा एक चांगला उपक्रम असून पक्षांना आधार मिळत आहे.

- मनीषा कदम, पर्यवेक्षिका, बालविकास विभाग

कोट

ग्रामीण भागात आता कडक ऊन पडण्यास सुरुवात झाली असून अशा परिस्थितीमध्ये पक्षांसाठी अन्नपाणी उपलब्ध व्हावे म्हणून अंगणवाडीमध्ये व्यवस्था केली जात आहे. हा एक आगळावेगळा उपक्रम आहे.

- राजेंद्र कड, बालविकास प्रकल्प अधिकारी.

फोटो कॅप्शन : फुलंब्री तालुक्यात ‘एक घास चिऊचा’ उपक्रमात प्रत्येक अंगणवाडीसमोर पाणी व अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Anganwadis now have 'Ek Ghas Chiula'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.