ऑक्सिजन टँकरचालक ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:04 AM2021-06-18T04:04:11+5:302021-06-18T04:04:11+5:30
औरंगाबाद : ऑक्सिजन टँकरचालकांनी अविरत वाहन चालवून नियोजित ठिकाणी वेळेत ऑक्सिजन पोहोचविला. ते सर्व चालक कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले. ...
औरंगाबाद : ऑक्सिजन टँकरचालकांनी अविरत वाहन चालवून नियोजित ठिकाणी वेळेत ऑक्सिजन पोहोचविला. ते सर्व चालक कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले. त्यांच्यामुळेच रुग्णांचे प्राण वाचल्याचे गौरवोद्गार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी काढले. कोरोना संकट काळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ऑक्सिजन टँकर चालकांचा आयुक्तांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा पार पडला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, अप्पर आयुक्त अविनाश पाठक, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपायुक्त पराग सोमण, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, उपायुक्त वीणा सुपेकर, मागासवर्गीय कक्षाचे उपायुक्त शिवाजी शिंदे, उपायुक्त (सा.प्र.वि.) जगदीश मनियार, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, संगीता सानप यांची यावेळी उपस्थिती होती. अपर आयुक्त पाठक, उपायुक्त सुपेकर यांचा यावेळी विशेष सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना ऑक्सिजन टँकरचालक राजू जोगदंड म्हणाले, प्रशासनाने आमची दखल घेतल्याने आम्ही भारावलो आहोत. या काळात आम्ही जीव ओतून काम केले. त्याचे मोल झाल्याचे आम्हाला समाधान आहे. दिनेश चिंचने, राम खटले, माधव गवई, दीपक गोर्डे, ऋषी वाणी, विष्णू बहीर, ज्ञानेश्वर निकाळजे, दीपक आलदाट, सय्यद निसार या ऑक्सिजन टँकरचालकांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.