विद्यापीठाच्या वसतिगृह शुल्कवाढी विरोधात संताप; विद्यार्थी, प्राध्यापक, अधिसभा सदस्य आक्रमक
By राम शिनगारे | Published: April 15, 2024 11:55 AM2024-04-15T11:55:25+5:302024-04-15T12:00:02+5:30
विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क २ हजार ६५ रुपयांवरून थेट ३ हजार २०० रुपये करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऐन दुष्काळात ५० टक्क्यांहून अधिक शुल्क वाढविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्राध्यापक संघटना, अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी शुल्कवाढीचा निषेध नोंदवित तीव्र संताप व्यक्त केला आहे. या शुल्क वाढीच्या विरोधात व्यापक आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क २ हजार ६५ रुपयांवरून थेट ३ हजार २०० रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही चार्जेस वाढविण्यात आले. या निर्णयाचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. एसएफआय, पॅंथर्स रिपब्लिक विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीसह इतर संघटनांनी या शुल्कवाढीचा निषेध नोंदविला आहे. त्याशिवाय वाढविण्यात आलेले शुल्क हाणून पाडण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्णयही विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे. विद्यार्थी संघटनांच्या लढ्याला स्वाभिमानी मुप्टा, बामुक्टोसह इतर प्राध्यापक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच अधिसभा सदस्यांनी या शुल्कवाढीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.
मागच्या दुष्काळात मोफत जेवण दिले
ऐन दुष्काळात वसतिगृहांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असताना आम्ही निधी उभारून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना चार महिने मोफत जेवण देऊन स्थलांतर थांबविले. आताचे प्रशासन नफेखोरीसाठी शुल्कवाढ करीत आहे. त्याचा जाहीर निषेध करीत शुल्कवाढ मागे घ्यावी.
- डॉ. नरेंद्र काळे,अधिसभा सदस्य
हा तर तुघलकी निर्णय
वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात ऐन दुष्काळात शुल्कवाढ केली जात आहे. हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून, असा तुघलकी निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास राज्यपालकांकडे दाद मागण्यात येईल.
-प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी, अधिसभा सदस्य
विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव
विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी येतात. याठिकाणी अल्पदरात शिक्षण मिळण्याची त्यांना हमी होती. मात्र, आता शिक्षण महाग करून ग्रामीण भागातील विद्यार्थीच येऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यातून विद्यापीठ बंद पाडण्याचाच डाव असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात सर्वजण एकत्र येत संघटित लढा उभारणार आहोत.
- डॉ. उमाकांत राठोड,अधिसभा सदस्य
अन्याय सहन केला जाणार नाही
विद्यापीठात बहुजन विद्यार्थ्यांचा वाली कोणीही राहिला नाही. प्रशासन चुकीच्या नियुक्त्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करते. त्यावर कोणीही काही बोलत नाही. त्यात विद्यार्थ्यांचे दुष्काळात शुल्क वाढविले जाते. विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय सहन केला जाणार नाही. याविरोधात लढा उभारला जाईल.
- प्राचार्य शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य
वसतिगृहांचा कायापालट करण्याचा संकल्प
विद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क कमी ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. त्याचबरोबर वसतिगृहांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. शुल्क वाढविले असले तरी त्या तुलनेत सुविधा अधिक प्रमाणात वाढणार आहे. मागील अनेक वर्षांपासून शुल्क वाढविण्यात आलेले नव्हते म्हणून यावेळी मान्यता दिली आहे.
-डॉ. योगिता होके पाटील,व्यवस्थापन परिषद सदस्य
कमीत कमी वाढीचा प्रयत्न
विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी विविध २१ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. जी काही शुल्क वाढ करण्यात आली, त्यातही कमीत कमी वाढीचा आग्रह धरला होता. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सर्वांत कमी शुल्क आपल्याकडचे आहे.
- ॲड. दत्ता भांगे, व्यवस्थापन परिषद सदस्य.