बहिणीच्या प्रेमविवाहात मदत केल्याचा राग; बापलेकावर घातली जीप, तरुणाला चिरडून केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:14 PM2024-03-29T14:14:28+5:302024-03-29T14:14:36+5:30
गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा शिवारातील घटना
सावखेडा ( छत्रपती संभाजीनगर) : बहिणीच्या प्रेमविवाहात मदत केल्याच्या संशयावरून बाप-लेकांच्या अंगावर जीप घालून मुलास ठार केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा शिवारात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, एका आरोपीविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन शिवराम मोढे (वय २६ वर्षे, रा. ओझर, ता. गंगापूर), असे मृताचे नाव असून, याप्रकरणी सचिन भागचंद वाघचौरे (रा. धूपखेडा, ता. पैठण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सचिनच्या बहिणीने मागील काही दिवसांपूर्वी शिवराम एकनाथ मोढे यांच्या भाच्यासोबत प्रेमविवाह केला होता. यात शिवराम आणि त्यांचा मुलगा पवन यांनी मदत केल्याच्या संशयावरून सचिन आणि त्याच्या वडिलांच्या मनात राग होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी शिवराम हे मुलगा पवन याच्यासह धामोरी येथे केले होते. तेथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास परत गावी येत असताना शेंदूरवादा शिवारात सचिनने जीपच्या सहाय्याने शिवराम व पवन यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली.
जोरदार धडकेने दुचाकीवरील शिवराम बाजूला पडले. तर दुचाकी चालक पवन दुसऱ्या बाजूला गाडीसह फेकला गेला. शिवराम यांनी जखमी मुलगा पवन यास उठवले. मात्र, याचवेळी पुढे गेलेली जीप पुन्हा वेगात परत आली. यावेळी जीव वाचविण्यासाठी शिवराम बाजूला झाले परंतु, जीपने पवनला जोरदार धडक दिली. डोक्यावरून चाक गेल्याने मेंदू बाहेर पडून पवनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जीपमधील सचिनसह दोघे आणि इतर दोन दुचाकीवरील तिघे तेथून पसार झाले. जखमी शिवराम यांच्यावर सावखेडा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शिवराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने करीत आहेत.
पवनचा होणार होता एप्रिलमध्ये विवाह
एप्रिलमध्ये पवनचा विवाह होणार होता. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोकाँ गणेश लक्कास, पोकाँ संदीप धनेधर यांचे पथक परिसरात रवाना करण्यात आले आहे.