घाटी रुग्णालयात ‘अँजिओग्राफी’ सुरू; पण ‘अँजिओप्लास्टी’ला मुहूर्त मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 07:22 PM2022-10-05T19:22:13+5:302022-10-05T19:26:18+5:30
ही सुविधा सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात तब्बल ३ वर्षांनंतर ऑगस्टपासून ‘अँजिओग्राफी’ला सुरुवात झाली. मात्र, ‘अँजिओप्लास्टी’ला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे ‘ब्लाॅकेज’चे निदान झाल्यानंतर हृदयरोगाच्या रुग्णांना अँजिओप्लास्टी करण्यासाठी घाटीतून खासगी रुग्णालय गाठण्याचीच वेळ येत आहे.
घाटीत केंद्र आणि राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून उभे राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये कॅथलॅब उभारण्यात आली, परंतु दोन वर्षे कोरोना, त्यानंतर मनुष्यबळाअभावी अँजिओग्राफी,‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा सुरू होण्यासाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागली. अखेर बहुप्रतीक्षित ‘ॲँजिओग्राफी’ची सुविधेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. या सुविधेमुळे हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ही सुविधा सुरू झाल्यानंतर लवकरच ‘अँजिओप्लास्टी’ची सुविधा सुरू केली जाईल, असे घाटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले, मात्र अद्यापही त्याला सुरुवात झालेली नाही. ही सुविधा सुरू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
दीड महिन्यात २२ अँजिओग्राफी
घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये गेल्या दीड महिन्यांत २२ रुग्णांच्याय अँजिओग्राफी करण्यात आल्या आहेत. हृदयविकारात बंद असलेली रक्तवाहिनी ‘अँजिओप्लास्टी’ करून उघडता येते. जितक्या लवकर रक्तवाहिनी उघडली तितक्या लवकर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू पूर्ववत काम करू लागतात आणि पर्यायाने हृदयाची कार्यक्षमता (पंपिंग) चांगली राहते. ही सुविधा घाटीत कधी सुरू होते, याकडे रुग्णांचे लक्ष लागले आहे.