नाराज इच्छुकांनी फडकवले बंडाचे झेंडे
By Admin | Published: September 28, 2014 12:27 AM2014-09-28T00:27:30+5:302014-09-28T00:41:12+5:30
संतोष धारासूरकर ,जालना जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षातील इच्छूक पुढाऱ्यांनी स्वकियांनी उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ अन्य पक्षामार्फत किंवा अपक्ष
संतोष धारासूरकर ,जालना
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षातील इच्छूक पुढाऱ्यांनी स्वकियांनी उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ अन्य पक्षामार्फत किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत स्वकियांसमोर आव्हान उभे केले आहे.
महायुती व काँग्रेस आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच शुक्रवारी सकाळपासून या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या. विशेषत: चारही प्रमुख पक्षांना तगड्या उमेदवाराच्या शोधार्थ मोठी धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे त्या-त्या पक्षातील नाराज इच्छुकांनी तातडीने नव्या प्रस्तावांना मान्यता दिली. स्वकियांविरुद्ध थेट बंडाचा झेंडा फडकावला. पक्षीय बंधनांसह विचार वगैरे थेट धाब्यावर बसवून नव्या पक्षामार्फत उमेदवारी दाखल केली. ‘हम भी कुछ कम नही’ हे मातब्बरांना दाखवून दिले.
शनिवारी सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत या नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. कोण कोण्या पक्षामार्फत उमेदवारी दाखल करतोय, हे जाणकारांना सुद्धा उमजले नाही. जेव्हा अधिकृतपणे घोषणा झाल्या, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या.
पाचही मतदारसंघात पारंपारिक विरोधकांबरोबरच वर्षानुवर्षांपासून मैत्री असणाऱ्या पक्षांच्या विरोधात दंड थोपाटून मातब्बरांनी पडद्यावर किंवा पडद्याआड खेळ्या खेळल्या. त्याद्वारे एकमेकांसमोर आव्हाने उभी केली आहेत.
राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जालन्यातून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचे नेते रमेश गव्हाड यांनी भोकरदनमधून भाजपा उमेदवाराच्या विरोधात बंड केले.शिवसेनेमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथून काँग्रेसचे एल.के. दळवी तर राष्ट्रवादीचे शफिक खान पठाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब आकात यांनी परतूरमधून जागा न सोडल्याच्या निषेधार्थ मनसेच्या तंबूत विसावून स्वकियांविरुद्ध बंड केले. येथूनच प्रा. राजेश सरकटे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या तर सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेच्या तंबूत दाखल होऊन उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीचे नेते सुभाष मगर यांनी ऐनवेळी बदनापुरात काँग्रेसकडून तर शिवसेनेचे नगरसेवक बाबूराव पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करीत खळबळ उडविली.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विलास खरात, हिकमत उढाण यांनी उमेदवारीसाठी सर्वत्र प्रयत्न केले. ऐनवेळी खरात यांनी भाजपाच्या तर उढाण यांनी शिवसेनेच्या तंबूत डेरे दाखल करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्वकियांविरुद्ध ऐनवेळी काहींनी बंड तर काहींनी संधी साधून, घोड्यावर स्वार होऊन जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडविली आहे. दरम्यान, पाचही मतदार संघात शुक्रवारी रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत पडद्यावरच्या व पडद्याआडच्या सुद्धा घडामोडी रंगल्या होत्या. विशेषत: महायुती व आघाडीतील युती संपुष्टात आली खरी परंतु या जिल्ह्यात मातब्बर पुढाऱ्यांनी किमान स्थानिक पातळीवर आपापसातील मैत्री टिकावी, एकमेकांना अडचणीचे होणार नाहीत, असे उमेदवार रिंगणात उतरावेत म्हणून गुप्तपणे खलबते सुरू केली. दोन्ही काँग्रेसजण तसेच शिवसेना व भाजपातील काहीजण या मोहिमेवर होते. मोठी मतविभागाणी टळावी म्हणून सोयीचे उमेदवार असावेत, असा सूर पडद्याआडच्या घडामोडींमधून उमटत होता. परंतू त्यातील चर्चेसह निर्णयांना कितपत यश मिळाले, हे कळू शकले नाही. मात्र मित्र पक्षांच्याच विरोधात तगडे उमेदवार उभे करीत जिल्ह्यातील मातब्बरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याच्या खेळ्या खेळल्या, असे चित्र होते.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवार या अखेरच्या दिवसानंतर एकूण १७६ उमेदवारांनी २६५ अर्ज दाखल केले आहेत.
४जालना विधानसभा मतदारसंघातून ४१ उमेदवारांनी ६१ अर्ज, बदनापुरातून ३३ उमेदवारांनी ५८, घनसावंगीतून ३१ उमेदवारांनी ४५, परतूरमधून ३२ उमेदवारांनी ४८ तर भोकरदनमधून ३९ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
४या निवडणुकीच्या छाननीनंतर कोण उमेदवार माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, पाचही मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांची गर्दी झालेली असून काही ठिकाणी बंडखोरीही करण्यात आली आहे.
संजय कुलकर्णी ल्ल जालना
जालना विधानसभा मतदारसंघातून ३० उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरविंद चव्हाण यांनी भाजपाच्या तंबूत दाखल होऊन शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या दीड-दोन दिवसातील विलक्षण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार रिंगणात येईल, हे सांगणे कठीण बनले होते. विशेषत: या दोन्ही पक्षांकडून अर्धा डझन उमेदवारांची नावे चर्चे आली होती. परंतू राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी शुक्रवारी अचानक कोलांटउडी मारली. ते भाजपाच्या तंबुत जावून बसले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यात ते दिसेनासे झाल्याने जाणकारांना शंका आलीच होती. चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा नेतृत्वास दुषणे देवून भाजप जवळ केल्याचा दावा केला. आणि शनिवारी समर्थकांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला.
विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (काँग्रेस), माजी मंत्री अर्जुन खोतकर (शिवसेना) या दोघा मातब्बर पुढाऱ्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या पाठोपाठ रशीद पहेलवान (बसपा), संदीप खरात (पँथर्स रिपब्लिकन), सुधाकर निकाळजे (भारिप) यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष खुशालसिंह ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवि राऊत यांनी अंतिम मुदतीत म्हणजे शनिवारी अर्ज दाखल केला. या व्यतिरिक्त येथून खालील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परमेश्वर यादवराव वाहुळे, फिरोज समदखान, ज्ञानेश्वर नाडे, रवि म्हस्के, आनंद म्हस्के, धनसिंह सूर्यवंशी, ज्ञानेश्वर वाघ, शेख कदिर, संगिता गोरंट्याल, संतोष मोरे, आनंदा ढोंबरे, सुदाम बनसोडे, कैलास घोरपडे, फारुक इलाही, मो. साजेद, पांडुरंग कोल्हे, नागसेन बनकर, बळीराम कोलते, दत्तात्रय कदम, महंमद उस्मान, रतन लांडगे, दिपक बोरडे, सुनिल खरे, सुनिल साळवे, भाऊराव साळवे, अर्जुन भांदरगे वैभव उगले यांचा समावेश आहे.
दिलीप सारडा ल्ल बदनापूर
बदनापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक बाबूराव पवार, तर राष्ट्रवादीचे नेते सुभाष मगर यांनी ऐनवेळी स्वकियांविरुद्ध बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले आहेत. त्यात आ. संतोष सांबरे (शिवसेना), माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस), नारायण कुचे (भाजपा), सुभाष मगर (काँग्रेस), माऊली गायकवाड (मनसे), अॅड. ब्रह्मानंद चव्हाण (रिपाइं आठवले गट), अॅड. शिवाजी आदमाने (रिपब्लिकन सेना) या प्रमुख पक्षासह दुर्गा चौधरी, मगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अॅड. मगर यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या तंबूत दाखल होऊन उमेदवारी पटकावली. तर शिवसेनेचे जालन्याचे नगरसेवक बाबू पवार यांनी आ. सांबरे यांच्या विरोधात अर्ज दाखल करीत बंडाचा झेंडा रोवला. या मतदारसंघातून मधुकर कदम, भाऊसाहेब मगरे, भारत जाधव, प्रकाश नारायणकर, विकास लहाने (बसपा), बालचंद भगुरे, विश्वजित साबळे, ईश्वर बिल्होरे, अशोककुमार गायकवाड, प्रकाश मगरे (भारिप), अरुण जाधव, अभिजित भालशंकर (सपा), बबन कांबळे, ज्ञानोबा वाहुळे, दिलीप रोकडे, गणेश खरात, राजेश राऊत, माया जाधव आदींनी आपापल्या समर्थकांसह जावून अर्ज दाखल केले. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या गर्दीने तहसील कार्यालयाचा परिसर गर्दीने फुलून गेलेला होता. शहरही रॅली आणि घोषणांनी दणाणले होते.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास खरात यांनी भाजपाच्या व माजी सनदी अधिकारी हिकमतराव उढाण यांनी अखेर शिवसेनेच्या तंबूत विसावून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू कंटुले यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून काँग्रेसने प्रदेश सरचिटणीस संजय लाखे पाटील तर माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्याऐवजी हिकमतराव उढाण यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेना, भाजप व काँग्रेसकडून कोणाचा उमेदवारी अर्ज दाखल होणार, याबाबत कमालीची उत्कंठता निर्माण झाली होती. अखेर शुक्रवारी सायंकाळी खरात हे उमेदवारी पटकावून भाजपाच्या तंबूत दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळी नाट्यमय घडामोडीतून माजी आ. शिवाजीराव चोथेंऐवजी हिकमतराव उढाण यांना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी बहाल केली. तालुकाध्यक्ष विष्णू कंटुले यांच्याऐवजी प्रदेश सरचिटणीस संजय लाखे पाटील यांना उमेदवारी बहाल करीत काँग्रेसने यू टर्न घेतला. या व्यतिरिक्त मनिषा टोपे (राष्ट्रवादी), तुकाराम गाडे (बसपा), परमेश्वर खरात (बहुजन समाज पार्टी), रामभाऊ मोहिते (स्वाभिमानी पक्ष), सुनिल जाधव (बहुजन मुक्ती पार्टी), विजय पटेकर, किशोर मुन्नमलिक, बिन माझी तारेक मुबारक, भास्कर साळवे, आप्पाराव कदम, सय्यद इरफान रहेमान, शे. खुर्शिद अ. जिलानी, राधाकृष्ण रणपिसे, देविदास कोळे (भारिप बहुजन महासंघ) यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, ३१ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत.
परतूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब आकात यांनी मनसे, ज्येष्ठ उद्योगपती सोमनाथ साखरे यांनी शिवसेना व प्रा. राजेश सरकटे यांनी अंतिम क्षणी राष्ट्रवादीच्या तंबूत विसावून उमेदवारी अर्ज दाखल केले.
आ. सुरेश जेथलिया यांनी शुक्रवारी काँग्रेसमार्फत तर भाजपाचे माजी आमदार बबनराव लोणीकर शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु या दोघा पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब आकात यांनी मनसेकडून उमेदवारी पटकावून रिंगणात उडी मारली. युती व आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच या दोन्ही पक्षाकडून कोणते उमेदवार रिंगणात येणार, याबाबत उत्कंठता होती. शिवसेनेने ऐनवेळी उद्योगपती सोमनाथ साखरे यांना देखील रिंगणात उतरविले. तर प्रा. राजेश सरकटे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला. शनिवारी उमेदवारी अर्ज केला. या व्यतिरिक्त माधवराव कदम, मोहन अग्रवाल, सूर्यकांत बरकुले (शिवसेना), मारोती खंदारे (कम्युनिस्ट पक्ष), भिकाजी डवरे (भाकप) तसेच शिवाजी तरवटे, भगवान पाटोळे, अ.शे. रफीक, रमेश राठोड, बरेखानी महंमद, आसाराम साबळे, बाळकृष्ण कानडे, गोपाळ बोराडे, विजय वेढेकर, जिजाबाई जाधव, प्रभाकर रणशूर, चोखाजी सौंदर्य, रामराव राठोड, निवास जाधव, शेख अजहर, राहुल लोणीकर, अकबरखॉ, हरिभाऊ चव्हाण, अतिष राठोड, मोईन कुरेशी, भीमराव वाघ, सचिन राठोड यांनी अर्ज दाखल केले. या मतदारसंघात ३२ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, रिंगणातील उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे पेच निर्माण झाला आहे.
फकीरा देशमुख ल्ल भोकरदन
भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश गव्हाड यांनी उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ शनिवारी अनपेक्षितपणे शिवसेनेच्या तंबूत विसावून बंडाचा झेंडा फडकावला.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एल.के. दळवी तर राष्ट्रवादीचे नगरसेवक शफिक खान पठाण यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. या मतदारसंघात एकूण ३९ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दानवे यांना भाजपाने शनिवारी उमेदवारी जाहीर केली. दानवे यांनी लगेचच एबी फॉर्म दाखल केला. राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांनी शुक्रवारी एबी फॉर्मसह उमेदवारी दाखल केली. परंतु महायुती व आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवाराबाबत कमालीची उत्कंठता निर्माण झाली होती. काँग्रेसने तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांना रिंगणात उतरवले. तर ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशमुख यांचे एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर नाव टाकले. भाजपाचे माजी सभापती रमेश गव्हाड हे नाराजच होते. शिवसेनेने युती संपुष्टात आल्यापाठोपाठ गव्हाड यांच्याशी सख्य जोडले. त्यांनीही शनिवारी भाजपास सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली. लगेच त्यांनी अर्जही दाखल केला. जाफराबाद येथील सरपंच नसीरखान पठाण यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही उमेदवारांमुळे चौरंगी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.