विटावात संतप्त महिलांनी पाईपलाईन फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 08:20 PM2019-05-04T20:20:25+5:302019-05-04T20:20:47+5:30
वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला.
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील विटावा गावचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महिनाभरापासून पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी गावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडून टाकत आपला राग व्यक्त केला.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखणाऱ्या जाणाºया घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया विटावा गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. समर्थनगरमध्ये भीषण पाणीटंचाईमुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. गावचा पाणीप्रश्न सोडविण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली. याची दखल घेत ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत १ कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करुन पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले.
मात्र, दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाईपलाईन टाकून गावला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या पाईपलाईनवर अनेकांनी अवैध नळ जोडणी घेतली आहे. या प्रकारामुळे बहुतांश भागातील रहिवाशांना पाणी मिळत नाही.
महिनाभरापासून पाणी येत नसल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी शनिवारी एमआयडीसीच्या जलवाहिनीतून गावला पाणीपुरवठा करणारी अंतर्गत पाईपलाईन फोडली. तोडलेले पाईप उपसरपंच रामकिसन म्हस्के यांच्या घरासमोर आणून टाकत पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली. महिलांचे रौद्ररुप पाहून उपसरपंच म्हस्के यांनी पीव्हीसी पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याचे आश्वास दिले. यावेळी सुनिल कानडे, सोपान सातपुते, अंकुश देवबोन, कैलास शिनगारे, राजू गव्हाणे, अरुण गव्हाणे, विलास पिठले, राहुल पोटफाडे, संतोष पोटे, अजय तागड आदींसह महिला - पुरुष उपस्थित होते.
तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा बंद
एमआयडीसीने ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यात कपात केली असून, शुक्रवारी एमआयडीसीचे पाणी आले नाही. तसेच गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी सकाळी फुटली. या तांत्रिक अडचणीमुळे विटावा गावाला सुरळीत पाणीपुरवठा करता आला नाही. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने दोन खाजगी टँकरने पाणीपुरवठा केला, असे ग्रामविकास अधिकारी बी.बी. गव्हाणे यांनी सांगितले.