संतप्त महिलांचा सिडको कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:14+5:302021-06-09T04:06:14+5:30

वाळूज महानगर : ढिसाळ नियोजनामुळे सिडको वाळूज महानगरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुरळीत पाणी पुरवठा ...

Angry women sit in CIDCO office | संतप्त महिलांचा सिडको कार्यालयात ठिय्या

संतप्त महिलांचा सिडको कार्यालयात ठिय्या

googlenewsNext

वाळूज महानगर : ढिसाळ नियोजनामुळे सिडको वाळूज महानगरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने सोमवारी (दि.७) संतप्त महिलांनी सिडको कार्यालयात ठिय्या देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सिडको वाळूज महानगरातील एलआयजी व एमआयजीमध्ये दहा दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने या भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिडको प्रशासनाकडून अत्यल्प व कमी दाबाने तसेच रात्री-अपरात्री पाणी पुरवठा केला जात असल्याने भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. या परिसरात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीही संतप्त नागरिकांनी सिडकोच्या कार्यालयात आंदोलन करीत काही काळ अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले होते. सिडको प्रशासनाकडून सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

देवगिरीनगर, जिजामातानगर येथे सोमवारी दहा दिवसांनंतर पाणी आल्यानंतर काही वेळातच पाणी पुरवठा बंद झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सिडकोच्या कार्यालयावर धडकत ठिय्या दिला. गत महिनाभरापासून या भागातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. वेळापत्रकाप्रमाणे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामोरे जावे लागत असल्याचा आरोप छाया कुकलारे, उषा भोसले, प्रिया देशमुख, अलका देशपांडे, लता पोफळे, मंदाकिनी देसले, जयश्री आम्ले, आशा लव्हाळे, रोहिणी उभेदळ, सुनीता झुंजार, संगीता राजपूत, गायत्री भोसले, मंदा काकडे, तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, हसन शेख आदींनी केला. यावेळी संतप्त महिलांनी सिडकोचे सहायक अभियंता मारुती वावरे यांना धारेवर धरले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढत सहा. अभियंता वावरे यांनी काही दिवसांपासून एमआयडीसीकडून सिडको प्रशासनाला अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने या भागातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याची कबुली दिली. या परिसरात सुरळीत पाणी करण्याचा प्रयत्न सिडको प्रशासनाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो ओळ

सिडको वाळूज महानगरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतप्त महिलांना सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Web Title: Angry women sit in CIDCO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.