महामार्गाने घेतली प्राण्यांची काळजी, दोन ओव्हर आणि अंडर पास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:40 AM2022-04-01T09:40:24+5:302022-04-01T09:41:03+5:30
हुबेहूब जंगलाची अनुभूती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. या महामार्गावर टोल अथवा अन्य कारणांसाठी कुठेही न थांबता अखंड प्रवासाची सुविधा तर आहेच; पण वन्य प्राण्यांना दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे जाता यावे यासाठी दोन ठिकाणी वाइल्ड लाइफ ओव्हर पास आणि दोन ठिकाणी अंडर पास तयार केले जात आहेत.
पहिल्या टप्प्यात साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागील चार दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे हे कारने वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत समृद्धी महामार्गावरूनच आले. रात्री औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
औरंगाबाद जिल्ह्यातून १२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जात असून, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्यात आले आहेत, तर सावंगीच्या पूर्वेला पोखरीजवळ बोगदा उभारण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन्य प्राण्यांना अडथळा येऊ नये, विना व्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर दोन ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पास’ व दोन ‘अंडर पास’ तयार करण्यात आले आहेत. यापैकी दौलताबादच्या अलीकडे व जटवाड्याजवळ ‘वाइल्ड लाइफ ओव्हर पास’ तयार केला जात आहे.
हुबेहूब जंगलाची अनुभूती
वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने सुचविलेल्या ठिकाणी हे ओव्हर पास व अंडर पास तयार केले जात आहेत. ओव्हर पास महामार्गावरून जाईल. सध्या त्यांच्या स्लॅबचे काम झाले असून, त्यावर मुरूम, दगडगोटे, माती व मोठी झाडे लावली जाणार आहेत. हुबेहूब जंगलातील रस्त्यांची अनुभूती देणारे ओव्हर पास व अंडर पासला तयार केले जात आहेत.