पहिल्यांदाच पशुगणनेत भटक्या प्राण्यांचाही समावेश; डिजिटल स्वरूपात माहितीचे संकलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:40 IST2024-12-19T16:39:38+5:302024-12-19T16:40:33+5:30
पशुगणनेची तीन महिन्यांची प्रक्रिया; जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्ष्यांची माहिती संकलित

पहिल्यांदाच पशुगणनेत भटक्या प्राण्यांचाही समावेश; डिजिटल स्वरूपात माहितीचे संकलन
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली आहे. मोबाइल ॲपचा वापर करून या गणनेची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जात आहे. पशुगणनेत आतापर्यंत शेतकऱ्यांकडील पाळीव पशूंचाच विचार केला जात होता; मात्र गेल्या काही दिवसांत भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्या जनावरांची नोंद झाली, तर आकडेवारीमध्ये पारदर्शकता येईल तसेच पुढे योग्य ते धोरण राबविणे शक्य होणार आहे. त्यानुसार या पशुगणनेत पाळीव प्राण्यांसोबत भटक्या प्राण्यांची देखील जाती, उपजातींची, लिंग, वयाची नोंद केली जात आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. दुग्ध उत्पादक शेतकरी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जात आहे. शेतकरी, पशुपालकांकडील पाळीव पशुधन, उद्योग, संस्था, संघटनांच्यावतीने पाळलेल्या गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशूंसह मेंढी, शेळी, वराह, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती तसेच कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, शहामृग व इमू यांसारखे कुक्कुट पक्षी याव्यतिरिक्त भटकी कुत्री, भटक्या गाई आणि भटका पशुपालक समुदाय यांचीदेखील माहिती संकलित करण्यात येत आहे.
फेब्रुवारीपर्यंत चालणार पशुगणना
सन १९१९ पासून आतापर्यंत एकूण २० वेळा पशुगणना करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पशुगणना करण्यात आली होती. आता २५ नोव्हेंबरपासून २१ व्या पशुगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून ती फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या पशुगणनेसाठी जिल्ह्यात २५६ प्रगणक आणि ४९ पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ३ हजार कुटुंबांमागे १ प्रगणक आणि ५ प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक, तर शहरी भागात ४ हजार कुटुंबांमागे १ प्रगणक आणि १० प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत.