‘ॲनिमल’ वर सोशल मिडियात घमासान, कमेंटमधील वाद धर्मावर येत आले रस्त्यावर, मध्यरात्री तणाव

By सुमित डोळे | Published: December 19, 2023 01:18 PM2023-12-19T13:18:56+5:302023-12-19T13:32:37+5:30

मध्यरात्री जिन्सीत तणाव, पोलिसांनी बारा तासांत संशयिताचा लावला शोध

'Animal' debate on social media turns religious controversy in Chhatrapati Sambhajinagar | ‘ॲनिमल’ वर सोशल मिडियात घमासान, कमेंटमधील वाद धर्मावर येत आले रस्त्यावर, मध्यरात्री तणाव

‘ॲनिमल’ वर सोशल मिडियात घमासान, कमेंटमधील वाद धर्मावर येत आले रस्त्यावर, मध्यरात्री तणाव

छत्रपती संभाजीनगर : ‘ॲनिमल’ सिनेमावरून सोशल मीडियावर सुरू झालेली चर्चा पुढे आक्षेपार्ह धार्मिक वादापर्यंत येऊन थांबली. एका गटाच्या तरुणांनी आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या गटातील तरुणानेही आक्षेपार्ह टिपण्या केल्या. यातून जिन्सीत रविवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी किशोर गणेश गव्हाणे (२७, रा. वैजापूर) याला अटक केली. तर, दुसऱ्या गटातील तरुणांच्या आक्षेपार्ह कमेंट्सचेही पुरावे गोळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिन्सी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टवरून मोठा जमाव जमला होता. उपायुक्त नवनीत काँवत यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत जमावाची समजूत काढली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून तत्काळ पथके रवाना केली. पोलिसांना प्रोफाईलधारकाचे छायाचित्र मिळाले होते. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी पहाटे ३ पर्यंत तो संशयित किशोर गव्हाणे असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. भोपाळला पळून जाण्यापूर्वीच कन्नड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाला ३ वाजता किशोरचे रिक्षातील छायाचित्र मिळाले. त्यावरून आधी रिक्षाचालक, नंतर तो काम करत असलेला मेडिकल चालकाला ताब्यात घेतले. त्यात तो वानखेडेनगर मध्ये राहत असल्याचे कळाले.

भोपाळला पळण्याच्या तयारीत
तोपर्यंत किशोरला त्याच्या उपद्व्यापामुळे झालेल्या परिणामांची माहिती मिळाली होती. सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट बंद करून त्याने तत्काळ हेल्मेट घालत भोपाळच्या दिशेने दुचाकी पळवली. मात्र, पथकाने त्या आधीच त्याला पकडले. किशोरच्या वडिलांचे १९९८ मध्ये निधन झाले असून, आईचे आजाराने २०२१ मध्ये निधन झाले. त्याला दोन विवाहित बहिणी असून किशोर शहरात एकटाच राहतो.

मग दुसऱ्यांदा शेकडोंचा जमाव आला कसा ?
११ वाजता एका गटाने जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. सकारात्मक चर्चेनंतर ते परत गेले. मात्र, १२ वाजता अचानक पुन्हा शेकडोंचा जमाव जमला. त्यामुळे पोलिसही अचंबित झाले. मूळ तक्रारदार येऊन गेल्यानंतरही पुन्हा शेकडोंचा जमाव जमला कसा, असा गंभीर प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला.

नेमकी घटना काय ?
-बी. फार्मसीचा विद्यार्थी असलेला किशोर पुंडलिकनगरातील मेडिकलमध्ये कामाला होता. तेथे मात्र त्याचे जिन्सीत राहणाऱ्या सहकाऱ्यासोबत एका मुलीवरून वाद झाले. त्यानंतर वर्षभरापूर्वी किशोरने नोकरी सोडली.
-मैत्री तुटली तरी किशोर व अन्य तरुण सोशल मीडियावर एकमेकांना जोडले गेलेले होते. पाच दिवसांपूर्वी एका मुलीने ‘ॲनिमल’ सिनेमावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली. किशोर कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त झाला. त्याच्या जुन्या सहकाऱ्यांनी कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स सुरू केल्या.
-जुने वाद, सिनेमावरील कॉमेंट्सचे युद्ध काही वेळातच धार्मिक कॉमेंट्समध्ये परावर्तित झाले. त्याच्या प्रत्युत्तरात किशोरनेही आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्या.
-तरुणांनी स्वत:च्या कॉमेंट्स डिलिट करून किशोरच्या कॉमेंट्सचे स्क्रीनशॉट काढले. ते रविवारी व्हायरल केले. त्यातून तणाव निर्माण झाला.

Web Title: 'Animal' debate on social media turns religious controversy in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.