महामार्गांमुळे बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर; मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 04:19 PM2020-11-25T16:19:15+5:302020-11-25T16:21:18+5:30
विकास कामे पशू-पक्ष्यांच्या मुळावर आली आहेत
औरंगाबाद : धुळे-सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, औरंगाबाद-पुणे रस्त्याचे रुंदीकरण यात प्रचंड वृक्षतोड झाली असून, अनेक वन्यजीवांचा अधिवास नष्ट झाला आहे. यामुळे बिबट्यासह इतर प्राण्यांचे मानवी वस्तीत येणे, आता मानवाची चिंता वाढविणारे ठरत आहे. विकास कामे पशू-पक्ष्यांच्या मुळावर आली असून, बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर झाले आहेत. २०१८ नंतर हे प्रमाण प्रकर्षाने वाढले असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याविषयी सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक म्हणाले की, दरवर्षी २ ते ४ अजगर पकडले जायचे. २०१८ नंतर ते प्रमाण १५ ते २० पर्यंत गेले आहे. यातील ७ ते ८ अजगर शेततळ्यात सापडले आहेत. विषारी-बिनविषारी साप सापडण्याचे प्रमाण २०१७ पर्यंत दरवर्षी ७५ ते ८० एवढे असायचे, ते प्रमाण आता १५० ते १७० एवढे झाले आहे. २०१७ पर्यंत जिल्ह्यात सांबर म्हणजेच स्पॉटेड डीअर दिसले नव्हते. ते अत्यंत दुर्मिळ मानले जातात. आता अधिवास नष्ट झाल्याने खुलताबाद तालुक्यात आणि औरंगाबाद शहरात सातारा परिसरातील मानवी वस्तीतही स्पॉटेड डीअर आढळून आले आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन मेले. काळवीट, हरिण यांच्यावर कुत्र्यांचा हल्ला होणेही आता नित्याचेच झाले असून, कोल्हे, लांडगेही दर महिन्यात आढळून येत आहेत. प्राणी-पक्षी संकटात सापडले असून, विकास कामे करताना या पशू-पक्ष्यांचीही पर्यायी व्यवस्था करण्याची गरज प्रशासनाने प्रकर्षाने लक्षात घ्यावी, असे वन्यजीव प्रेमी सांगत आहेत.
हस्तक्षेप करून आपलेच नुकसान
सृष्टी संवर्धन संस्थेने मागच्या अडीच वर्षांत ५७२ पक्ष्यांची सुटका करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. कोल्हे, लांडगे, तरस हे सहसा लवकर न दिसणारे प्राणी वाल्मी, विद्यापीठ, हिमायत बागेच्या मागील माळरान येथे दिसून येत आहेत. हे सर्व प्राणी-पक्षी परिपूर्ण परिसंस्था तयार करून सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवत असतात. आपण त्यात हस्तक्षेप करून आपलेच नुकसान करीत आहोत.
- डॉ. किशोर पाठक, वन्यजीव अभ्यासक व पक्षीमित्र