जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

By विजय सरवदे | Published: May 30, 2024 07:26 PM2024-05-30T19:26:02+5:302024-05-30T19:26:50+5:30

३१ मेपूर्वी आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करून घेण्याचा सल्ला

Animals can be bought and sold only if they have ear tagging | जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

जनावरांचे इअर टॅगिंग असेल तरच मिळणार आरोग्य सुविधा, करता येणार खरेदी-विक्री

छत्रपती संभाजीनगर : इअर टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून पशुधनाच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली जाणार आहे. १२ अंकी असलेली ही इअर टॅगिंग म्हणजे जनावरांचे आधार कार्डच आहे. विशेष म्हणजे, हा टॅगिंग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक असणार आहे. त्यामुळे जनावरांचे टॅगिंग केले नसेल, तर पशुपालकांनी ते ३१ मेपूर्वीच करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

आरोग्य सुविधांपासून कोणतेही पशुधन वंचित राहू नये, यासाठी आधार कार्डच्या धरतीवर पशुधनासाठी ईअर टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. १ जूननंतर इअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून वैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक साहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसानभरपाईची रक्कम देय होणार नाही.

- सर्व पशूंना इअर टॅगिंग आवश्यक

इअर टॅगिंगच्या माध्यमातून सर्व पशुधनाच्या नोंदी ठेववल्या जाणार आहेत. यात जन्म-मृत्यूची नोंद, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधी, मालकी हक्क हस्तांतरण यासह अन्य नोंदी असणार आहेत.

- पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक

सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी. जेणेकरून पशुधनांमधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमन २००९ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशू व पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे इअर टॅग करून त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- पशुधन खरेदी-विक्रीलाही प्रतिबंध

इअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- एक जूनपासून अंमलबजावणी

एक जूनपासून सर्व पशुधनासाठी टॅगिंगशिवाय खरेदी-विक्रीला बंदी, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही.

शासनाने इअर टॅगिंग सक्तीचे केले असून, त्यामुळे जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण या बाबी कळून येतात. एवढेच नाही, तर पशुधनाचे प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू, आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी ३१ मेपर्यंत आपल्या जनावरांना इअर टॅगिंग करावे.

- डॉ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प.

Web Title: Animals can be bought and sold only if they have ear tagging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.