ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली; गुन्हेगार मित्रांमुळे बनला सराईत बाईक चोर
By सुमित डोळे | Published: September 7, 2023 07:52 PM2023-09-07T19:52:44+5:302023-09-07T19:53:59+5:30
सिडको पोलिसांनी दुचाकी चोर अटकेत, तीन दुचाकी जप्त
छत्रपती संभाजीनगर : ॲनिमेशनचा कोर्स करुन उत्तमप्रकारे बांधकामक्षेत्रासाठी डिजाईनचे काम करणारा तरुण संतोष अशोक सुरसे (३४, रा. सारा परिवर्तन, हर्सूल) गुन्हेगारीकडे वळला. मित्र, दारुच्या आहारी जाऊन नंतर त्याने थेट दुचाकी चोरी सुरू केली. सिडको पोलिसांनी दुचाकी चोरीचा शोध घेत असताना तो बुधवारी रंगेहाथ सापडला.
सिल्लोडचे साईनाथ खेळवणे यांची २६ ऑगस्ट रेाजी सकाळी सहा वाजता शरद टि पॉईंट येथील देवगिरी बँकेसमोरुन दुचाकी चोरीला गेली होती. त्या शिवाय, शिवाजी गाडेकर यांची देखील त्याच जागेवरुन दुचाकी चोरीला गेली. सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अमोल म्हस्के, कृष्णा घायाळ यांनी याप्रकरणी तपास सुरू केला. त्याच दरम्यान त्यांना एक तरुण सातत्याने विनाक्रमांकाच्या वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी जाधववाडीच्या मैदानावर त्याच्यासाठी सापळा रचला होता. तो येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरलेल्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
ॲनिमेशनमध्ये हातखंडा, पण संगत चुकली
संतोष सुशिक्षित असून ॲनिमेशनचे कोर्स केले आहे. त्याच्याकडे बांधकाम क्षेत्रातील अनेक कामे असतात. मात्र, चुकीची संगत, व्यसनामुळे तो गुन्हेगारीकडे वळला. चोरीच्या दुचाकी घरी घेऊन जाता येत नव्हत्या म्हणून एन-११ च्या बाळासाहेब उद्यानाजवळ ते दुचाकी उभी करत होते. यापूर्वी त्याने चोरीच्या काही दुचाकी विकल्याची कबुली दिली. ही कारवाई अंमलदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, लालखान पठाण, विशाल सोनवणे, अमोल अंभोरे यांनी केली.